घरमहाराष्ट्रविक्रोळीत शिवसेनेच्या उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार

विक्रोळीत शिवसेनेच्या उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार

Subscribe

गोळीबार करणार्‍या मारेकर्‍याला अटक; रिव्हॉल्व्हर जप्त , प्रॉपटीच्या वादातून सुपारी देऊन गोळीबार झाल्याचे उघड

विक्रोळी येथे शिवसेनेचे उपविभागप्रमुख चंद्रशेखर केशव जाधव यांच्यावर एका अज्ञात मारेकर्‍याने गोळीबार केला. त्यात त्यांच्या उजव्या दंडाला दुखापत झाली असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबारानंतर पळून जाणार्‍या अभय विक्रम सिंग या 22 वर्षांच्या मारेकर्‍याला स्थानिक नागरिकांनी पकडून विक्रोळी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. प्राथमिक तपासात हा गोळीबार प्रॉपटीच्या वादातून सुपारी देऊन झाल्याचे उघडकीस आले आहे. या कटातील मुख्य आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

चंद्रशेखर जाधव हे शिवसेनेचे उपविभागप्रमुख असून ते सध्या विक्रोळीतील रमाकांत देशमुख मार्ग, टागोरनगरातील हेरंब इमारतीच्या 42/13 मध्ये राहतात. गुरुवारी सकाळी सात वाजता ते नेहमीप्रमाणे साईबाबा मंदिरात जाण्यासाठी घरातून निघाले. टागोरनगर व्यायाम शाळेच्या बाजूने जात असताना अचानक त्यांच्यासमोर एक तरुण आला. काही कळण्यापूर्वीच त्याने त्यांच्या दिशेने गोळीबार केला, त्यातील एक गोळी चंद्रशेखर जाधव यांच्या उजव्या हाताच्या दंडातून आरपार केली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. अचानक गोळीबाराचा आवाज येताच तिथे लोक जमा झाले. त्यांनी पळून जाणार्‍या मारेकर्‍याला पाठलाग करुन पकडले. त्याला स्थानिक रहिवाशांनी बेदम मारहाणही केली. तसेच मारेकर्‍याला लोकांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

- Advertisement -

या मारेकर्‍याचे नाव अभय सिंग असल्याचे उघडकीस आले. तो उत्तर प्रदेशच्या अलाहाबादचा रहिवाशी असून काही दिवसांपूर्वीच तो उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता. मारहाणीत तो जखमी झाल्याने त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रॉपटीच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. अभयला उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने चंद्रशेखर जाधव यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी त्याला 25 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. मात्र गोळीबारात चंद्रशेखर हे थोडक्यात बचावले.

गोळीबारानंतर अभय सिंग उत्तर प्रदेशात पळून जाणार होता, मात्र स्थानिक लोकांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्या चौकशीतून यातील सुपारी देणार्‍या व्यक्तीचे नाव समोर आले असून त्याच्या अटकेसाठी विक्रोळी पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच उत्तर प्रदेशात जाणार आहे. अभय सिंगविरुद्ध पोलिसांनी 307, 34 भादवी सहकलम 3, 25 भाहका कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -