घरमहाराष्ट्रSindhudurg : कैद्यांनी आदर्शवत शेती करत कमावले लाखोंचे उत्पन्न; तुरुंग अधीक्षकांच्या 'भगीरथ'...

Sindhudurg : कैद्यांनी आदर्शवत शेती करत कमावले लाखोंचे उत्पन्न; तुरुंग अधीक्षकांच्या ‘भगीरथ’ प्रयत्नांना यश

Subscribe

सिंधुदुर्ग : कारागृह म्हणजे मोठमोठ्या दगडी भिंती, कुंपण, शिक्षा भोगणारे कैदी, पोलीस आणि तुरुंग अधीक्षक असे चित्र समोर येते. कारण सहसा सामान्य माणूस व जेल यांचा फारसा संबंध नसतो आणि कुणी इथे जाण्यास इच्छुकही नसतो. मात्र सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह याला अपवाद ठरले आहे. जिल्ह्यात आवर्जुन उल्लेख करावा अशी अनेक ठिकाण आहेत, पण आता त्यात सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचा उल्लेख करावासा वाटतो. (Sindhudurg District Jail Prisoners earn income of lakhs by doing ideal farming Jail Superintendent Raivndra Tonge Bhagirath Efforts Succeed)

सिंधुदुर्गनगरी येथे 2016 मध्ये जिल्हा कारागृह सुरु झाले. त्यावेळी आतमध्ये फक्त म्हणण्यापुरती मोकळी जागा व जंगलमय पडीक जमीन होती. 2022 मध्ये जिल्हा कारागृह अधीक्षक रवींद्र टोनगे यानी इथला कार्यभार स्वीकारला आणि आपल्या व कैद्यांच्या मेहनतीने या कारागृहाचा कायापालट केला. उंच सखल असलेली पडीक जमीन सपाट करून जमिनीची मशागत करत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची शेती करून कारागृहात अक्षरशः बहार आणली. नजर जाईल तिथपर्यंत हिरवे ताटवे व त्यावर लगडलेली ताजी टवटवीत भाजी, मंद सुवासाची फांद्या वाकेस्तोवर उमलेली गुलाब, सुविचारांच्या व विश्व प्रार्थनेच्या बोलक्या भिंती आणि गाईच्या गळ्यातील घंटेची मधूर कीणकीण कारागृहाचे रुक्ष वातावरण बदलून टाकतात.

- Advertisement -

हेही वाचा – Sunil Kedar यांची आमदारकी रद्द करण्याची एवढी घाई का? अतुल लोंढेंचा सवाल 

सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहातील कैद्यांनी आपल्या मेहनतीने भाज्यांची शेती करून अक्षरशः भाज्यांचा मळा फुलवला आहे. या भाज्यांच्या शेतीमधून मागील आठ महिन्यात आपली गरज भागवून तब्बल चार लाखांचे उपन्नही घेण्यात आले आहे (चार लाख उत्पन्न हे सरकारी रेट नुसार आहे, बाहेरील बाजार भाव धरला तर हे उत्पन्न अधिक होईल). येथील कैदी हेही आपल्या सारखेच माणूस आहेत. आयुष्यात योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने, भरकटल्याने तर काही अनहूतपणे गुन्हा घडल्याने कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या अंगी असलेले चांगले गुण व कौशल्य तुरुंग अधीक्षक रवींद्र टोणगे यांनी हेरले. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कारागृहातील कैद्यांनी केलेली भाजी शेती व अन्य उपक्रम राज्यासाठी आदर्शवत ठरताना दिसत आहेत. याबाबत राज्याचे पोलीस महानिरीक्षक यांनी विशेष कौतुकही केले आहे.

- Advertisement -

आज सिंधुदुर्गचे जिल्हा कारागृह संपूर्ण राज्यात आदर्श ठरले आहे. यासाठी येथील तुरुंग अधीक्षक व इतर कर्मचारी यांची मेहनत व आवड आहे. कारण यांनी हे काम फक्त नोकरी म्हणून न करता आपले कर्तव्य व समाजाप्रती आपली जबाबदारी समजून केल्यामुळेच आज हे चित्र दिसत आहे. कारागृहात योगा शिबीर, जीवन विद्या मिशन मार्फत प्रार्थना असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे बंदिवान कैद्यावर चांगले संस्कार होऊन त्यांच्यामध्ये खूप चांगली सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – INDIA : प्रभू श्रीराम तरी भारत देश वाचवतील काय? अन्यथा…, संजय राऊतांनी व्यक्त केली भीती

“हम अंग्रेजो के जमाने के जेलर है” हा फेमस डायलॉग आपण सर्वांनी ऐकला आहे. फक्त सिनेमातून पाहिलेला करारी व करडी नजर असलेला कठोर बोलणारा तुरुंग अधीक्षक अशी काहीशी छबी ‘जेलर’ म्हटले की आपल्या समोर उभी राहते. पण सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहाचे रूप व येथील कैद्यांना मानसिक, शाररिक व आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनण्यास मदत करणारे तुरुंग अधीक्षक टोनगे या चौकटीला छेद देतात.

बंदिवान कैद्यांमार्फत आधुनिक व सेंद्रिय स्वरूपाची शेती

कारागृहाच्या शेतीमध्ये गवार, शेवगा शेंग, पडवळ, भेंडी, कारले, वाल शेंग, चवळी, दुधी, डांगर, काकडी, हिरवी मिरची, वांगे, दोडके इत्यादी फळभाजी व लाल माठ, हिरवा माठ, पालक, मुळा, कोथिंबीर इत्यादी पालेभाज्यांची लागवड करण्यात येते. कारागृहाच्या शेतीमध्ये उत्पादीत भाजीपाला कैद्यांच्या स्वयंपाकासाठी वापरण्यात येतो. तसेच उर्वरित भाजीपाला सावंतवाडी कारागृह व रत्नागिरी विशेष करारागृह येथे पुरवठा करण्यात येतो. लोकांच्या मागणीनुसार भाजीपाल्याची विक्रीही करण्यात येते. याशिवाय स्थानिक बाजारातही भाजीपाला विक्री करण्यात येतो. त्यामुळे एप्रिल 2023 पासून नोव्हेंबर 2023 अखेरपर्यंत तब्बल 3 लाख 25 हजार रुपयांचे उत्पादन भाजीच्या शेतीमधून कारागृहाने मिळालेले आहे. मार्च 2024 पर्यंत म्हणजे एका वर्षात 6 लाख रुपयापर्यंत उत्पन्न जाईल, असा तुरुंग अधीक्षकांचा विश्वास आहे. जिल्हा कारागुहात करण्यात आलेल्या शेतीचा कैद्यांवर एवढा प्रभाव पडला की, शिक्षा संपून घरी परतल्यावर घरच्या जमिनीतीत भाज्यांची शेती करून रोजगाराचे साधन निर्माण करणार, असा विश्वास बंदिवान कैद्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Parle Festival 2023 चे शानदार उद्घाटन; फडणवीसांकडून गौरवोद्गार, म्हणाले…

तुरुंगातून बाहेर पडल्यावर भागीरथ प्रतिष्ठान कैद्यांना करणार मदत

सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात केवळ शेतीच नाही तर एक गाय व वासरू आणून गोपालन सुरु केले आहे. गोपालानामुळे शेतीसाठी लागणारे जिवामृतही तयार करून वापरण्यात येते. करागुहात शेती करण्यामागे जसे तुरुंग अधीक्षक रवींद्र टोणगे यांचे मोठे योगदान आहे, तसे भागीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांचेही आहे. त्यांनी भागीरथ प्रतिष्ठांनच्या माध्यमातून भाजीपाला शेती करण्यासाठी शेती औजारे व मार्गदर्शन करून फार मोठी मदत केली आहे. कैद्यासाठी दररोज 15 लिटर दूध लागते. त्यासाठी दुधाळ जनावरे देण्याचेही डॉ. देवधर यांनी मान्य केले आहे. कैद्यांसाठी कार वॉशिंग सेंटर सुरु करण्यासाठी मदत करण्याचेही त्यांनी मान्य केले आहे. जिल्हा करागुहातील ज्ञानसिंग ठाकूर या कैद्याने टेलरिंग व्यवसाय सुरु केला असून त्याच्याकडून कारागृह अधीक्षक व डॉ. देवधर यांनी स्वतःचे कपडे शिवून घेतले असून आता तर जिल्हा रुग्णालयातील रुग्णासाठी लागणारे कपडे शिवण्याची ऑर्डर मिळायला लागली आहे. एका कैद्याने केस कटिंग करण्याचे कामही सुरु केले आहे. त्यामुळे टेलरिंग आणि सलून कारागृहाबाहेर सुरु करण्यासाठी भागीरथ प्रतिष्ठांकडून मदत करण्यात येईल, असे आश्वासन डॉ. देवधर यांनी दिले आहे.

तुरुंग अधीक्षक रवींद्र टोणगे यांची बदली

जिल्हा कारागृहाचे नंदनवन बनविणारे जिल्हा तुरुंग अधीक्षक रवींद्र टोणगे यांची मुंबईत ऑर्थर रोड करागुहात बदली झाली आहे. मेहनत करणारी व्यक्ती कुठेही गेली तरी आपली चमक दाखवतेच, पण आता रिक्त झालेल्या कारागृह अधीक्षकपदी नव्याने रुजू होऊन कार्यभार स्विकारणाऱ्या अधीक्षकांवर हा कष्टाचा मळा असाच फूलता ठेवण्याची जबाबदारी राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -