घरसंपादकीयओपेडनेते मंडळी मालामाल, सर्वसामान्य बेहाल!

नेते मंडळी मालामाल, सर्वसामान्य बेहाल!

Subscribe

प्राप्तिकर विभागाने झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांचे घर आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छापेमारीत रोख 351 कोटी रुपये सापडले. प्राप्तिकर विभागाने पाच दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील नऊ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. त्यावरून राजकारण रंगले आहे. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम माझा कौटुंबिक व्यवसाय असलेल्या मद्य कारखान्याची आहे. असा खुलासा खासदार धीरज साहू यांनी केला आहे. अशी गबर नेत्यांची अनेक उदाहरणे आहेत, पण मतदार जनता मात्र हतबल आहे.

ईडी, प्राप्तिकर विभाग यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी ठिकठिकाणी छापे टाकून कोट्यवधी रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. शिवाय, अलीकडेच दोन दिवसांत तीन राजकारण्यांना भ्रष्टाचार प्रकरणात शिक्षा ठोठावली गेली आहे. मुळात हे केवळ हिमनगाचे टोक आहे, प्रत्यक्षात या नेत्यांसह इतर राजकारण्यांचादेखील प्रामाणिकपणे हिशोब केला, तर प्रत्येक भारतीयांचे ‘अच्छे दिन’ येतील. बादशाह आणि बिरबलाची एक कथा सांगितली जाते. बादशाहाच्या मेव्हण्याला बिरबलाची जागा हवी असते. बेगमही त्यासाठी आग्रही असते. त्याची परीक्षा घेण्यासाठी तो एक कोळशाने भरलेली गोण त्याच्याकडे देतो आणि ती राज्यातील सर्वात कंजूष व्यापार्‍याला विकायला सांगतो. तो व्यापारी एक दमडाही न देता, ती संपूर्ण गोण आपल्याकडे ठेवून घेतो. मग बिरबलला ते काम सोपविले जाते. बिरबल त्या गोणीतील केवळ एक कोळसा घेऊन जातो. त्याची बारीक पूड करून एका चकचकीत सुरेख डबीत ठेवतो आणि जाहिरात करतो. हा जादूचा सुरमा आहे. तो डोळ्यात घातल्यानंतर आपले पूर्वज दिसतात आणि दडवून ठेवलेल्या धनाची माहितीही देतात.

त्या लोभी व्यापार्‍याच्या कानावर ही बातमी पडते आणि तो लगेच बिरबलाला गाठतो. 1000 सुवर्ण मुद्रांमध्ये त्या ‘सुरम्या’चा सौदा करतो, पण एक अट ठेवतो, ‘हे आधी पडताळून पाहणार आणि हे सर्व बनावट निघाल्यास सुवर्ण मुद्रा परत घेणार.’ बिरबल अट मान्य करतो. तो व्यापार्‍याला शहरातील मध्यवर्ती दवंडी चौकात घेऊन जातो आणि सांगतो की, ‘हा जादूचा सुरमा आहे. आई-वडील एकमेकांशी प्रामाणिक असतील आणि त्यांनी एकमेकांशी कधीच बेइमानी केली नसेल, तर डोळ्यात सुरमा घालणार्‍याला ते दिसतील आणि ते अनेक गुपिते उघड करतील.’ व्यापार्‍याच्या ते लक्षात येते की, आपण येथे फसलो आहोत. त्याला तो सौदा पूर्ण करावा लागतो. आजकाल सर्वत्र हेच चालले आहे. राजकारणी बिरबल नसले तरी, सर्वसामान्यांच्या गळी असाच सुरमा उतरवत आहेत आणि सर्वसामान्यदेखील कळत-नकळत असेच चालाख नेत्यांच्या जाळ्यात फसत आहेत. या जनतेच्या जीवावर राजकारणी आपल्या तिजोर्‍या भरत आहेत. मग पश्चिम बंगाल असो, तामिळनाडू असो, झारखंड असो, उत्तर प्रदेश असो किवा महाराष्ट्र असो… सर्वत्र हेच सुरू आहे.

- Advertisement -

भ्रष्टाचार प्रकरणात देशातील तीन राज्यांच्या तीन आजी-माजी मंत्र्यांना दोन दिवसांत कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यातील दोघांना प्रत्येकी तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, तर एकाला पाच वर्षांची. बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी 21 डिसेंबर 2023 रोजी तामिळनाडूतील द्रमुक नेते आणि उच्च शिक्षणमंत्री के. पोनमुडी आणि त्यांच्या पत्नीला मद्रास उच्च न्यायालयाने तीन वर्षांची शिक्षा सुनावतानाच प्रत्येकी 50 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सन 2006 ते 2011 या काळात मंत्रीपदी असताना के. पोनमुडी यांच्याकडे ज्ञात स्रोतांपेक्षा 1.75 कोटी रुपयांची अधिक मालमत्ता आढळली होती आणि ही मालमत्ता कशी मिळवली, याची माहिती ते देऊ शकले नाहीत, तर त्याच्या दुसर्‍या दिवशीच म्हणजेच 22 डिसेंबर 2023 रोजी उत्तर प्रदेशमधील बहुजन समाज पक्षाचे नेते आणि माजी उच्च शिक्षणमंत्री राकेशधर त्रिपाठी यांनाही एमपी-एमएलए न्यायालयाने तीन वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 18 जून 2013 रोजी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यानुसार त्यांच्या आणि त्यांच्या निकटवर्तींच्या ज्ञात आणि वैध स्रोताद्वारे 45.82 लाख रुपये उत्पन्न होते, परंतु खर्च केलेली रक्कम 1 कोटी 81 लाख 20 हजार रुपये होती.

महाराष्ट्रातील नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा निकालही 22 डिसेंबर 2023 रोजीच लागला. या प्रकरणात माजी मंत्री, आमदार सुनील केदार यांच्यासह सहा आरोपींना विविध गुन्ह्यांसाठी कमाल पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल तब्बल 21 वर्षांनी जाहीर झाला. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांनी प्रत्येकाला 12 लाख 50 हजार रुपये दंडही ठोठावला आहे. केदार हे बँकेचे अध्यक्ष असताना 2001-2002 मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रमणी मर्चंट्स प्रा.लि. कोलकाता, सेंच्युरी डीलर्स प्रा.लि. कोलकाता, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्व्हिसेस अहमदाबाद आणि गिल्टेज मॅनेजमेंट सर्व्हिसेस मुंबई या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून बँकेच्या रकमेतून 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. विशेष म्हणजे, रोखे खरेदी करणार्‍या या कंपन्या बुडीत निघाल्या. या कंपन्यांनी बँकेला सरकारी रोखेही दिले नाहीत आणि बँकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप होता.

- Advertisement -

अर्थातच, हे तिघेही आता वरच्या न्यायालयात अपील करतील आणि पुन्हा खटला सुरूच राहील. कालांतराने लोकांच्या हे विस्मृतीत जाईल. हेच पुन्हा मंत्रीपदावर विराजमान होतील. आता चवीने चर्चा करणारे त्यांचाच जयजयकार करतील. हे होतच राहणार आहे. प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांनी ‘आपण सारे अर्जुन’ (1997) पुस्तकात म्हटले आहे त्याप्रमाणे – ‘भारतात आज अजूनही सत्तर टक्के लोक निरक्षर आहेत म्हणून निवडणुकीत मत कुणाला द्यायचं, या संभ्रमातून ते मुक्त आहेत. त्यांची झोपडी वाचवली, म्हणजे तो नेता स्मगलर्सशी संबंध ठेवतो का? त्याच्या घरात परवान्याशिवाय शस्त्रास्त्र सापडली का? यावर मतदार विचार करत नाही.’ प्रत्येक मतदार सारासार विचार करत नाही, हेच तर या पुढार्‍यांचे कवच आहे. मतदारांच्या याच आशीर्वादावर विविध पदे भूषवित हे राजकारणी गब्बर होत चालले आहेत. प्राप्तिकर विभागाने झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांचे घर आणि इतर ठिकाणी टाकलेल्या छापेमारीत रोख 351 कोटी रुपये सापडले. प्राप्तिकर विभागाने पाच दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील नऊ ठिकाणी एकाच वेळी हे छापे टाकले होते. त्यावरून राजकारण रंगले आहे. जप्त करण्यात आलेली रोख रक्कम माझा कौटुंबिक व्यवसाय असलेल्या मद्य कारखान्याची आहे. मद्याचा व्यवसाय हा रोखीतूनच होतो, असा खुलासा खासदार धीरज साहू यांनी केला आहे.

जुलै महिन्यात पश्चिम बंगालमध्ये दोन ठिकाणी ईडीने टाकलेल्या छाप्यात जवळपास रोख 50 कोटी रुपये जप्त करण्यात आले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील तत्कालीन मंत्री पार्थ घोष यांना याप्रकरणी अटक करण्यात आली. 2016 मध्ये शिक्षक भरती घोटाळा झाला. आता या कारवायांवरून राजकारणही रंगते. विरोधकांनाच लक्ष केले जाते, हा आरोप शंभर टक्के जरी खरा असला तरी, दडवून ठेवलेले धन एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडले आहे, हे वास्तवही नाकारता येत नाही. समोर आलेल्या धनाच्या पलीकडेदेखील मालमत्ता असू शकते, हेही ध्यानात घेतले पाहिजे.

एवढे सर्व डोळ्यासमोर घडूनही या नेत्यांची बाजू घेत सोशल मीडियावर हमरी-तुमरीवर आपलेच मित्र आपल्यासमोर उभे ठाकतात, तेव्हा आश्चर्य वाटते. रस्त्यावर एक जण संत्र्यांचे साल कसे काढायचे, याचे एक छोटेसे यंत्र विकत असतो. ते पाहण्यासाठी त्याच्याभोवती गर्दी जमा होते. त्यात खरेदी करणारे हाताच्या बोटावर मोजणारेच असतात, बाकी सर्व बघेच असतात. ही गर्दी करणे जेव्हा बंद होईल, तेव्हाच या सर्व पुढार्‍यांना मतदारांसमोर जाताना दहा वेळा विचार करावा लागेल, तोपर्यंत हे असेच चालू राहणार आहे. नेत्यांकडून जप्त केलेले हे सर्व पैसे सर्वसामान्य जनतेचेच आहेत. जनता मात्र विविध प्रश्नांनी त्रस्त आहे.

येथे पुन्हा एकदा व. पु. काळे यांच्या ‘आपण सारे अर्जुन’ पुस्तकातील एका उतारा उद्धृत करता येईल – एका मानसोपचार तज्ज्ञानं एक प्रयोग केला. एका बेडकाला त्यानं उकळत्या पाण्यात टाकलं. बेडूक अर्थातच मेला. त्यानंतर दुसरा बेडूक घेतला. त्याला गार पाण्यात ठेवून पाणी हळूहळू गरम करायला प्रारंभ झाला. बेडकानं विचार केला, ‘पाणी कोमटच आहे. फार काही तकलीफ नाही, सहन करू.’ पाण्याचं तापमान आणखी वाढलं. बेडूक म्हणाला, ‘अजून काही असह्य झालेलं नाही. वाट पाहू.’ पाणी जास्त तापलं. ‘एवढ्यात उडी मारून भांडं सोडायची गरज नाही,’ म्हणत बेडूक गप्प राहिला. शेवटी मेला. सामान्य माणसांचं हेच होतंय. महागाई, वाढते पेट्रोलचे भाव तरीही रिक्षा-टॅक्सीवाल्यांनी ‘वो बाजू नहीं आएंगे’ म्हणणं, विद्यार्थ्यांची गळचेपी…बेडूकच व्हायचं आपण. अजून भांड्याबाहेर उडी मारायची नाही…

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -