प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्या

राज्यात दूध दरवाढीसाठी जोरदार आंदोलन

दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षासह काही शेतकरी संघटनांनी शनिवारी पहाटेपासून रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी जोेरदार आंदोलन केले. सध्या गायीच्या दुधाला प्रति लिटर १५ ते २० रुपयांचा दर मिळत आहे. दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या स्थितीत राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्यावे, तसेच दूध पावडरीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी भाजपसह मित्र पक्षांनी जोरदार आंदोलन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा जोर अधिक दिसून आला. तर मुंबई, ठाणे सारख्या शहरातही भाजप कार्यकर्त्यांकडूनही जोरदार आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही दिवसांपूर्वी दूध दरासाठी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने बोलावलेल्या बैठकीमध्ये कोणताच तोडगा न निघाल्याने १ ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यानुसार, किसान संघर्ष समितीबरोबरच भाजप, राष्ट्रीय समाज पक्ष व रयत क्रांती संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. रयत क्रांती संघटनेने शुक्रवारी रात्रीच सांगली जिल्ह्यातील आष्टा-भिलवडी आणि तासगाव- कराड मार्गावर दुधाचा टँकर फोडून आक्रमक होण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार शनिवारी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले तर काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त करण्यात आला. इस्लामपूर येथे दुधाची वाहतूक करणारी वाहने अडवून दुधाचे मोफत वाटप केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी पलूस येथे दुधाची वाहने अडवून घोषणाबाजी केली. यामुळे राज्यातील विविध ठिकाणच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पोलीस संरक्षणात दुधाची वाहतूक करावी लागली.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वाखाली नायगाव येथील शासकीय दूध संकलन केंद्राबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. तर पंढरपूरमध्ये रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात चंद्रभागा नदीच्या पात्रात विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नामदेव पायरीजवळ प्रतिकात्मक आंदोलन करताना विठ्ठलाच्या मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून सरकारचा निषेध करण्यात आला. ‘दुधाला १० रुपये दरवाढ मिळालीच पाहिजे’ अशा घोषणा देत रयत क्रांतीच्या कार्यकर्त्यांनी जालन्यात जोरदार आंदोलन केले. त्याचप्रमाणे परतूर शहरात मारुतीला दुधाचा अभिषेक करुन एल्गार केला.

औरंगाबादमध्ये शेतकर्‍यांच्या दूध आंदोलनाला भल्या सकाळी सुरुवात झाली. यावेळी आंदोलकांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रतिकात्मक दगडांना दूध अभिषेक घातला. शेतकर्‍यांकडून गावातील ग्रामदैवत गणपतीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक केला. बुलडाणामध्ये चिखलीत रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पहाटे ४ वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी मेहकर फाट्यावर दुधाचे टँकर अडवत कार्यकर्त्यांनी दुधाची नासाडी न करता शेतकर्‍यांना शहरात जाण्यापासून अडवत माघारी पाठवले.

‘राज्यातील दूध उत्पादक अडचणीत असताना सरकारमधील मंत्र्यांनी स्वतःच्याच दूध संघातील दूध खरेदी करून अनुदान लाटले. दूध उत्पादक उपाशी असताना सरकार मात्र तुपाशी आहे,’ अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर केली. त्यांनी आटपाडी येथे गायीला दुधाचा अभिषेक घालून आणि गायींसह रस्त्यावर ठिय्या मारून दूध दरवाढीचे आंदोलन केले.

दूध उत्पादक संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने अकोल्यात दूध दरवाढीबाबत जोरदार आंदोलन करण्यात आले. शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांनी यावेळी गाई चावडीवर बांधून सरकारचा प्रतिकात्मक निषेध केला. अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने शेतकर्‍यांचा तळतळाट आणि वेदना पाहू नये. तातडीने निर्णय घ्यावा. तसे न झाल्यास पुढील आंदोलन राज्यकर्त्यांच्या दारावर करावे लागेल,’ असाही इशारा अजित नवले यांनी दिला.

चंद्रकांत पाटलांच्या सूचना धाब्यावर
आंदोलनात रस्त्यावर दूध फेकले जाणार नाही, टँकर अडवले जाणार नाहीत, दुधाचा अभिषेक घातला जाणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यांच्या मित्रपक्षांनी याला हरताळ फासत टँकर तर फोडलेच, शिवाय अनेक ठिकाणी दुग्धाभिषेक देखील घातला. त्यामुळे पाटलांच्या सूचना धाब्यावर बसवल्याचे पाहायला मिळाले.

शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्या
– प्रति लिटर दुधाला १० रुपये अनुदान द्या
– ३० रुपये दुधाला हमी भाव द्या
– बाहेरुन आयात होणारी दूध पावडर बंद करा