घरमहाराष्ट्र'माय महानगर' इम्पॅक्ट - पुण्यात मारकुट्या शिक्षकावर बदलीची कारवाई!

‘माय महानगर’ इम्पॅक्ट – पुण्यात मारकुट्या शिक्षकावर बदलीची कारवाई!

Subscribe

पुण्याच्या राजगुरू नगरमध्ये क्षुल्लक कारणावरून पहिलीच्या अवघ्या ६ वर्षांच्या चिमुरड्याला बेदम मार देणाऱ्या शिक्षकावर बदलीची कारवाई करण्यात आली आहे.

राजगुरुनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाला ‘माय महानगर’ने वाचा फोडल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आहे. या प्रकरणी लक्ष्मण कडलग या शिक्षकाची चौकशी करून त्याची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शिक्षण विभागाने ही कारवाई केल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांनी ‘माय महानगर’शी बोलताना दिली आहे.

काय झालं होतं?

खेड पंचायत समितीच्या समोर जिल्हा परिषद शाळा क्र. १ आणि २ आहे. क्र. १ च्या मुलांच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थी समीर शैलेश रणदिवे (वय ६ वर्षे) याला शिक्षक कडलग यांनी शनिवारी दि. १३ रोजी बेंच वाजवल्याच्या कारणावरून काठीने पाठीवर जबर मारहाण केली होती. समीरच्या पाठीवर त्यामुळे सरसरीत वळ उठले होते. त्यानंतर समीरच्या पालकांनी त्याच्यावर दवखान्यात उपचार केले. मात्र, इतका गंभीर प्रकार घडूनदेखील मुलाबाबत शिक्षक वा इतर कोणीही साधी चौकशी देखील केली नव्हती. उलट हे प्रकरण दडपण्याचाचा प्रकार सुरू झाला होता. मात्र ‘माय महानगर’ने अन्याय झालेल्या मुलाच्या बेदम मारहाणीतली सत्यता मांडली आणि कारवाईला सुरुवात झाली.

- Advertisement -

..आणि गटशिक्षणाधिकारी शाळेत दाखल झाले

हे प्रकरण समोर आल्यानंतर इतर मुलांच्या पालकांमध्येही संतप्त प्रतिक्रिया उमटू लागली होती. पालक आणि नागरिकांच्या संतप्त भावना विचारात घेऊन पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सोमवारी दि. १५ रोजी सकाळी शाळेत जाऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली. शिक्षण विस्तार अधिकारी जीवन कोकणे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर सगळा प्रकार स्पष्ट झाला.

काय कारवाई झाली?

पीडित चिमुकला मुलगा, त्याचे पालक, वर्गातील इतर सर्व विद्यार्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक कडलग हे प्रथमदर्शनी दोषी आढळले. त्यामुळे शिक्षक कडलग यांच्या सेवा पुस्तकात शेरा नोंदवून विद्यार्थ्यांना भीती वाटू नये म्हणून त्यांची या शाळेतून गोलेगाव, ता. खेड येथे तडकफडकी बदली करण्यात आली, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली आहे. त्यामुळे मार बसलेल्या विद्यार्थ्याला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -