घरठाणेकायाकल्प पुरस्कारावर झेडपीच्या आरोग्य विभागाची मोहर

कायाकल्प पुरस्कारावर झेडपीच्या आरोग्य विभागाची मोहर

Subscribe

भिवंडीतील अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम

ठाणे : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कारावर यंदा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मोहर उमटवली. जिल्हामधील भिवंडी तालुक्यातील आनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र प्रथम; तर जिल्ह्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राना प्रशंसात्मक पुरस्कार जाहीर झाली आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देवून त्यांचे अभिनंदन केले.

सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि संसर्ग नियंत्रण पद्धती सुधारण्यावर नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. सन २०२१ – २२ मध्ये ठाणे जिल्ह्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कायाकल्प पारितोषिकाकरीता सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांचा अंतिम फेरीत समावेश करण्यात आला होता. त्यामधील भिवंडी तालुक्यातील आनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम पुरस्कार मिळाला असून धसई, दिवाअंजूर, वासिंद, शिरोशी, शेणवा आणि पडघा या प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रशंसात्मक पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली.

- Advertisement -

दरम्यान, कायाकल्प कार्यक्रमांतर्गत रुग्णालय देखभाल, स्वच्छता, जैविक व्यवस्थापन, जंतूसंसर्ग व्यवस्थापन, सपोर्ट सर्व्हिसेस, स्वच्छता प्रचार, रुग्णालय बाहेरील परिसर, या मापदंडाने ३६० गुण असतात . सन २०१५ पासून कायाकल्प योजना केंद्र शासनाने वैदकीय संस्थांच्या बळकटीकरण करण्यासाठी सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत ८ लाखाचे एकूण बक्षीस ठाणे जिल्ह्याला २०२१-२२ या वित्तीय वर्षात जाहीर झाले आहे. या पुरस्कार प्राप्त ७५ टक्के रक्कम संस्थांच्या बळकटीकरण करण्यासाठी व २५ टक्के रक्कम आरोग्य कर्मचारी यांच्या करिता आवशक़ सुविधांसाठी खर्च केली जाणार आहे.

कायाकल्प पुरस्कार प्रदान प्राथमिक आरोग्य केंद्रे
प्रथम पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र अनगाव ता.भिवंडी
प्रशंसात्मक पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र धसई ता.मुरबाड
प्रशंसात्मक पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र दिवाअंजूर ता.भिवंडी
प्रशंसात्मक पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र वाशिंद ता.शहापूर
प्रशंसात्मक पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोशी ता.मुरबाड
प्रशंसात्मक पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा ता.शहापूर
प्रशंसात्मक पुरस्कार – प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा ता.भिवंडी

- Advertisement -

“अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने मागील वर्षभरापासून खूप चांगले काम केले. त्यामुळे त्यांना कायाकल्प पुरस्कार मिळविण्यास यश आले आहे. त्यामुळे तेथील सर्व आरोग्य अधिकारी आणि कमचाऱ्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. तसेच इतर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी देखील अशाच प्रकारे काम केल्यास त्यांना देखील पुरस्कार मिळविता येतील. तर, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठीचा प्रस्ताव देखील जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे. ”
– मनुज जिंदल, मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. ठाणे,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -