घरमहाराष्ट्रखेळ मांडियेला आकडेवारीचा!

खेळ मांडियेला आकडेवारीचा!

Subscribe

चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले की नुकसानीचा सरकारी आकडा समोर येईल, मात्र प्रत्यक्षात नुकसान कैक पटीत झालेले असेल. परंतु सरकारी आकडे ‘बोलावे’ लागतात, मग त्यावर मदतीचा पुढचा निकष ठरवला जातो. वादळग्रस्तांचा आक्रोश काळीज फाडणारा आहे. तो सरकारपर्यंत किती पोहचला ते अजून माहीत नाही. हताश झालेले नुकसानग्रस्त नुकसानीची आकडेमोड करीत आहेत. सरकारी आकडेवारीच्या खेळातील सत्य अंतिम असल्याने त्यापेक्षा अधिक मदत मिळणार नाही याची कल्पना असलेल्यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता घरांची डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. कारण पाऊस सुरू झाल्याने वाट पाहत थांबणे त्यांना परवडणारे नाही. त्यामुळे ३०० ते ४०० रुपये किमतीचे पत्रे दुप्पट, तिप्पट किमतीने खरेदी करण्यात आले आहेत. घरात वीज नसल्याने पर्यायी व्यवस्था नाही म्हणून एक मेणबत्तीही दुप्पट ते तिप्पट किमतीने खरेदी केली जात आहे.

बागायतदार, शेतकरी, मच्छीमार यांच्यावर गेल्या वर्षभरात संकटांची मालिका सुरू आहे. यात हे सर्वजण भरडून निघाले आहेत. अनेकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. मात्र कोकणी माणूस संकटापुढे कधी शरणागती पत्करत नाही किंवा मदतीची याचना करीत बसत नाही. नुकसानग्रस्त भागात नेते, अधिकार्‍यांचे दौरे सुरू आहेत. मात्र हे एका ठराविक चौकटीतच होताना दिसतात. दौर्‍याचा शेवट काशीद किंवा श्रीवर्धनमध्ये एखाद्या अलिशान रिसॉर्टमध्ये बैठक घेऊन होतो. आज अशी अनेक गावे उपेक्षित आहेत की तेथे तलाठी, मंडळ अधिकार्‍याच्या पुढे कुणी पोहचतच नाही. नेते तेथे जाऊ शकणार नाहीत, कारण वाहने जाण्यासाठी धड रस्ता नाही. या खेडेगावातून, दुर्गम भागातून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मुरुडमधील राजकीय पक्षाच्या एका कार्यकर्त्याने दिली. घरांची छपरे, पत्रे उडाल्याने हालाला पारावार उरलेला नाही. पण पावसापासून लेकराबाळांचा बचाव करण्यासाठी उधार उसनवारी करून कौले, पत्रे आणले जात आहेत. काही सामाजिक कार्यकर्ते, दानशूर, सेवाभावी संस्थांनी वादळग्रस्तांना मदत केली आहे. परंतु त्याचे स्वरुप अर्थातच मर्यादित असल्याने सर्वांना लाभ होणे शक्य नाही. काहींशी बोलण्याचा प्रयत्न केला तर सरकारी मदत येईल तेव्हा कुठे कामाचे पान हलेल अशी अगतिकता बोलून दाखविली. अनेकांची घरे आणि व्यवसाय एकाच वेळी उद्ध्वस्त झाल्याने ठिगळे कुठे लावायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

- Advertisement -

असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेले आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र हरिहरेश्वर गाव चक्रीवादळानंतर अक्षरश: उद्ध्वस्त झाले आहे. अनेकांची घरे, तसेच किनारपट्टीवरील डौलाने उभ्या असलेल्या नारळ, पोफळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. सार्वजनिक मालमत्तेचीही मोठी हानी झालेली आहे. या ठिकाणी नेत्यांपैकी कुणी फारसे फिरकलेले नाही. तेथील रहिवासी मंदार लिडकर सांगतात, आम्हाला ही दुर्दशा पाहवत नाही. माणसे वाचली ही त्या हरेश्वराची कृपा. येणारी मदत तुटपुंजी असणार हे गृहित धरून शक्य आहे त्यांनी घराला घरपण द्यायचा प्रयत्न सुरू केला आहे. एरव्ही पर्यटक, भाविक यांच्यामुळे गजबजलेले हे टुमदार गाव आज सुनसान आहे. श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग तालुक्यातील मच्छीमारांची अवस्था विचित्र झाली आहे. मच्छीचा दुष्काळ, त्यात बोटींचे आणि घरांचेही नुकसान अशा तिहेरी संकटाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या वर्षभरात नैसर्गिक संकटामुळे अडचणीत आलेला मच्छीमार पुन्हा कुठे मच्छीमारीला सुरुवात करतोय तर करोनाच्या संकटामुळे मच्छीला भाव मिळत नव्हता. सुकवलेली विविध प्रकारची मासळी वादळी पावसात नष्ट झाली. आता पुढील तीन महिने मच्छीमारीवर बंदी. त्यामुळे खायचे काय, असा सवाल करीत मुरुड तालुक्यातील बोर्ली येथील मच्छीमार द्वारकेश कानगोजे यांनी समस्त नुकसानग्रस्त मच्छीमारांची प्रातिनिधिक व्यथाच मांडली.

भेटी देणारा प्रत्येक नेता नुसानग्रस्तांच्या पाठीशी आम्ही असल्याचे सांगतोय. याचा नेमका अर्थ कुणालाच समजलेला नाही. पालकमंत्री आदिती तटकरे म्हणतात, मदत कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी सरकार घेत आहे, तर रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी मदतीसाठी राज्याप्रमाणे केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. मात्र या वादळानंतर अनेक प्रश्न समोर उभे ठाकणार आहेत. सरकारी मदत ठराविक मर्यादेत मिळणार. यासाठी कर्जाला पर्याय नसल्याचे अनेकांनी सांगितले. परंतु उद्ध्वस्त झालेल्यांना बँका सहजासहजी कर्ज देतील याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे सरकारनेच यात काहीतरी मार्ग काढून दिला पाहिजे. तसेच नोकरीऐवजी शेती, बागायतीकडे वळलेला तरुण नैराश्याच्या गर्तेत जाऊन तो पुन्हा नोकरी शोधण्याचा प्रयत्न करेल ही शंका नाकारता येणार नाही. मुलाबाळांचे शिक्षण, घरातील आजारपण, इतर खर्च भविष्यात कसे भागवायचे, याची भ्रांत अनेकांना आहे. वादळानंतर कोटीच्या हिशोबात मनुष्य तास वाया जात आहेत. त्याचा परिणाम संसार, व्यवसाय याची पुनर्रचना करण्यावर होणार आहे. एकूणच सर्व प्रश्नांची उत्तरे शोधताना समोरचा शून्य बाजूला करावा लागेल.

- Advertisement -

वादळाला १४ दिवस होत असताना केंद्राचे मदत पथक रायगडसह रत्नागिरीच्या दौर्‍यावर आले. त्यांचा प्रतिसाद सकारात्मक वाटला. त्यामुळे केंद्राकडून किती मदत येणार आणि उद्ध्वस्त झालेली रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी, गावे, तसेच पेण, रोहे तालुक्यातील काही भागातील जनजीवन स्थिर होणार का, हा सवाल महत्त्वाचा आहे. आकडेवारीचा खेळ मांडून लवकरच पूर्ण होईल, पण त्यातून नुकसानग्रस्तांच्या पदरात काहीतरी घसघशीत पडू देत, अशीच आता प्रत्येकाची भावना आहे.

खेळ मांडियेला आकडेवारीचा!
Uday Bhisehttps://www.mymahanagar.com/author/uday-bhise/
गेली २७ वर्षे वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत. सामाजिक, राजकीय विषयांवर लिखाणाची विशेष आवड. डिजिटल मीडियाचाही अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -