घरमहाराष्ट्रपुराचे राजकारण

पुराचे राजकारण

Subscribe

कोल्हापूर आणि सांगलीतील महाभयंकर पुराने हाहा:कार उडवला असताना आता त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगलीचा दौरा करत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पाण्याचा विसर्ग करण्यास उशीर करूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरूप्पा यांचीच तळी उचलून धरली. याचवेळी पूरग्रस्तांना सरकारची दिली जात असलेल्या या मदतीच्या पिशव्यांवर भाजप नेत्यांचा प्रचार केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मदत करताना त्यावर आपले फोटो टाकले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पुराच्या राजकारणात उडी घेताना विधानसभा निवडणूक पुढील वर्षी घेण्याची मागणी केली. एकूणच पुरामुळे लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले असताना आता त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. त्याचे हे प्रासंगिक वास्तव…

शासनाचा उल्लेख अपेक्षित
पूरग्रस्तांना मदतीसाठी ७ ऑगस्ट रोजी जीआर निघाला. ८ ऑगस्ट रोजी पुरवठा दक्षता समितीचा अध्यक्ष या नात्याने बैठक घेऊन धान्य वाटपाचे नियोजन केले. हे धान्य पूरग्रस्तांच्या छावणीमध्ये नेऊन वाटप करण्यात येणार असल्याने धान्य वाटपामध्ये अफरातफर होऊ नये यासाठी शासनाचे स्टीकर लावण्याची सूचना केली होती. परंतु परस्पर माझा फोटो वापरून वाटप सुरू आहे. शासनाचे धान्य असल्याने त्यावर शासनाचा उल्लेख अपेक्षित आहे. – सुरेश हाळवणकर, आमदार, भाजप

- Advertisement -

शोबाजीपायी उपाशी माराल
सरकारची प्राथमिकता कशाला? तर स्टिकर छापायला. स्टिकर छापण्यासाठी पूरग्रस्तांना तब्बल २ दिवस मदत दिली नाही. लेकर-बाळे उघड्यावर पडलीत. यांना मात्र स्वत:चे फोटो टाकत स्टीकर डिझाईन करून, प्रिंट करून ते चिटकवण्यात तात्परता दाखवायची आहे. शोबाजी पायी उपाशी माराल लोकांना. – धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

मुख्यमंत्र्यांकडून महाजनांची पाठराखण
‘गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, उलट त्यांच्यामुळे पुरग्रस्त लोकांना दिलासा मिळाला’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची पाठराखण केली. शुक्रवारी महाजन यांनी सांगलीतील पूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी काढलेला व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि त्यावर टीकाही झाली. ‘महाजन प्रत्यक्षात पाण्यात उतरले. उलट त्यांच्या जाण्यामुळे तिथे अडकलेल्या लोकांना आपल्याकडे कुणीतरी आले, असा दिलासा मिळाला’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

- Advertisement -

राजकीय नेत्यांची मदत की प्रचार!

सध्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने हाहा:कार माजवला असताना राजकीय नेत्यांकडून मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. मात्र एकीकडे मदत देताना दुसरीकडे मदतीच्या नावाने हेच राजकीय नेते स्वत:चा वैयक्तिक प्रचार करतानादेखील दिसून येत आहेत. राजकीय नेत्यांची ही पूरग्रस्तांना मदत आहे की, मदतीच्या नावाखाली आगामी निवडणुकीचा प्रचार, असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे सगळे राजकीय नेते एकाच माळेचे मणी असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या.

सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यात ना सत्ताधारी मागे आहेत ना विरोधक. विशेष बाब म्हणजे राज्य सरकाकडून देण्यात येणार्‍या मदतीवरही जाहिरातबाजी करण्यात आली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना मोफत दहा किलो गहू आणि तांदूळ देण्यात येणार आहे. मात्र ही अन्नधान्याची मदत करत असताना गहू-तांदळच्या पिशवीवर सरकारची जाहिरातबाजी होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. इचलकरंजी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेली पत्रके अन्नधान्याच्या पाकिटावर लावण्यात आल्याने आता चहुबाजुने टीका होऊ लागली आहे.

दरम्यान अन्न व नागरी पुरवठा विभागाने ७ ऑगस्ट रोजी काढलेल्या जीआरवर बरीच टीका झाली होती. दोन दिवस पुराचे पाणी जमिनीवर असेल तरच दहा किलो गहू आणि तांदूळ मिळतील असा आदेश जीआरमध्ये काढण्यात आल्याने चहुबाजुने टीका होत होती. मात्र आता प्रत्यक्ष स्वरुपात मदत देताना मात्र स्थानिक आमदार, पदाधिकारी आणि मुख्यमंत्र्याचा फोटो लावून सरकारची जाहिरतबाजी करत आहे. त्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर येथे वाटण्यात आलेल्या मदतीवर आमदार आणि मुख्यमंत्र्यांसोबतच भाजपचे स्थानिक पदाधिकारी समिर शिंगटे आणि सुधाकर भोसले यांचीही नावे टाकण्यात आली आहेत.

एकीकडे सत्ताधार्‍यांवर राष्ट्रवादीचे नेते टीका करत असताना दुसरीकडे विरोधक देखील सत्ताधार्‍यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलुस येथे वाटलेल्या जेवणाच्या डब्यावर स्वत:चा फोटो चिकटवल्याचे पहायला मिळत आहे. मागील चार दिवसांपासून जयंत पाटील हे पूरग्रस्त भागामध्ये मदत करत आहेत. मात्र या फोटोमुळे आता त्यांच्यावरही सोशल मीडियावरून टीका होत आहे. ही टीका होत असताना पाटील यांनी जेवणाचे हे डबे आपण आपले वडील राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त वाटत आहोत, असा खुलासा केला आहे. भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी दोन किलोच्या गव्हाच्या पाकिटावर स्वतःचा आणि मुख्यमंत्र्यांचा फोटो लावून वाटप सुरु करुन बेशरमपणाचा कळस गाठला, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -