घरदेश-विदेशऋषिमुनींनी अंतराळात संशोधन केल्याचे नासानेही केले मान्य!

ऋषिमुनींनी अंतराळात संशोधन केल्याचे नासानेही केले मान्य!

Subscribe

आयआयटी मुंबईत केंद्रीय मनुष्यबळ मंत्र्यांची मुक्ताफळे

भविष्यात संगणकाचे अस्तित्त्व हे संस्कृत भाषेमुळेच टिकून राहणार आहे. जगामध्ये कोठेही हॉस्पिटल सुरू करायचे झाल्यास आयुष व आयुर्वेदाशिवाय ते शक्य होणार नाही. तसेच आपल्या ऋषिमुनींनी अंतराळात संशोधन केल्याचे ‘नासा’नेही मान्य केले आहे, अशी मुक्ताफळे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी उधळली. शनिवारी आयआयटी मुंबईच्या 57 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आयआयटी मुंबईच्या दीक्षांत समारंभामध्ये पोखरियाल यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संशोधनाचे महत्त्व पटवून देताना अणू-परमाणूचा शोध चरक ऋषींनी लावल्याचा अजब तर्क यावेळी मांडला. त्याचबरोबर जगात कोणतेही मोठे हॉस्पिटल सुरू करायचे असल्यास हॉस्पिटलमध्ये आयुष आणि आयुर्वेद प्रथम सुरू करावे लागेल.

या दोन शास्त्रांच्या आधारेच रुग्णचिकित्सा करण्याला प्राधान्य देण्यात येईल. संस्कृत भाषा ही वैज्ञानिक असून त्या भाषेमुळेच भविष्यात संगणकाचे अस्तित्त्व टिकून राहणार आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे त्यांनी गुगल सीईओ सुंदर पिचाई, नारायण मूर्ती, चेतन भगत हे या आयआयटी मुंबईतून शिकल्याचा चुकीचा उल्लेखही भाषणात केला. तंत्रज्ञान संस्थेच्या दीक्षांत समारंभात मंत्र्यांची ही वक्तव्ये ऐकून विद्यार्थ्यांमध्ये विनोद सुरू झाले. काहींनी ट्विट करत मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. भविष्यात भारताला विश्वगुरूचा भार पेलायचा आहे. त्यात युवा पिढीची विशेषत: आयआयटीमधून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची भूमिका मोलाची असणार आहे. भारताने जगाला योग दिला.

- Advertisement -

पूर्वी लोक पतंजलीला नावे ठेवत होती. पण आज हाच योग जगातील 199 देशामध्ये पोहचला आहे. मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधायचा असेल तर योग ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले. संस्कृती शिक्षणासोबत जोडली गेली पाहिजे. जगात काहीच नव्हते तेव्हा तक्षशिला, नालंदासारख्या विद्यापीठांमध्ये ज्ञान घ्यायला जगातले लोक यायचे. त्यामुळे आपण एक विश्वगुरू म्हणून आपल्या देशाला पुढे आणले पाहिजे. पाच वर्षांत जर आपल्या देशाला विश्वगुरू म्हणून समोर यायचे आहे तर याची सुरूवात तुमच्यापासून होणार आहे. जगात पहिल्या दोनशेमध्ये मुंबई आयआयटी संस्था आहे. आपल्याकडे सगळ्या सुविधा असल्यामुळे आपण प्रथम क्रमांकावर पोहोचले पाहिजे. यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय या संस्थेला लागेल ती मदत करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.

या सोहळ्यात २६०३ पदवी, ३८५ पीएचडी पदवी प्रदान करण्यात आल्या. तर, आधार कार्डचे जनक व उद्योगपती नंदन नीलेकणी यांना मानद ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ या पदवीने सन्मानित करण्यात आले. संस्थेतर्फे देण्यात येणारे राष्ट्रपती पदक यंदा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागातील श्रीवत्सन श्रीधर याला मिळाले. विजयकुमार ओबला आणि रिभू भट्टाचार्य यांनी इन्स्टिट्यूट गोल्ड मेडल पटकावले. प्रतिष्ठित डॉ. शंकरदयाळ शर्मा सुवर्ण पदकावर धृती शाह हिने नाव कोरले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निलेकणी यांनी त्यांच्या आयआयटी मुंबईच्या दिवसांचे स्मरण केले. तसेच मूड इंडिगो या महोत्सवाचे आयोजन करताना दोन वर्षांत मी एमबीए शिकल्याचेही ते म्हणाले. ही संस्था खर्‍या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करते असेही निलेकणी यांनी स्पष्ट केले. यावेळी कॅम्प्समधील हॉस्टेल १८चे उद्घाटन करण्यात आले.

- Advertisement -

पदकातील मराठी चेहरे
आयआयटी मुंबईत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना विविध पदके देऊन सन्मानित केले जाते. यंदा ४४ जणांना विविध पदकांनी सन्मानित करण्यात आले. यात अनिष कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, प्रतिक मापुस्कर, अनिकेत वझे या मराठी विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पीएचडी -३८५
एमएस -१२
एमएस्सी-एमटेक -६
एमटेक -५७६
मास्टर इन डिझाइन -५६
एमफील -२७
मास्टर इन मॅनेजमेंट -११०
दोन वर्ष एमएस्सी -२२६
इटिग्रेटेड एमएस्सी -१९
ड्युएल डीग्री -३६८
इंटर डिसिप्लीनरी ड्युएल डीग्री -४
बीएस, एमएस्सी -६
बीटेक -६८३
बीएस -२१
बॅचलर इन डिझाइन -१५
पीजीडीआयआयटी -१४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -