घरमहाराष्ट्र'मिंधे'-भाजपा खोके सरकारच्या दृष्टीने खऱ्या गद्दारांची किंमत... आदित्य ठाकरे यांची खोचक टीका

‘मिंधे’-भाजपा खोके सरकारच्या दृष्टीने खऱ्या गद्दारांची किंमत… आदित्य ठाकरे यांची खोचक टीका

Subscribe

मुंबई : शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. त्यावरून माजी मंत्री आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अजित पवार गटाबरोबरच मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे.

- Advertisement -

शिवसेना पक्षात बंडाचा झेंडा फडकावून उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या सरकारने नुकताच वर्षपूर्तीचा सोहळा साजरा केला. त्यानंतर गेल्या रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या समर्थक आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सहभागी झाला आहे.

विशेष म्हणजे, शपथविधीनंतर दोनच दिवसांनी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांच्यासह अन्य आठ मंत्री सहभागी झाले होते. त्यानंतर अजित पवार यांनी खातेवाटपाबाबत भाष्य केले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस नागपूरला जाणार आहेत. तिथे या दोघांमध्ये खातेवाटपाबाबत चर्चा होईल आणि गरज पडल्यास माझ्याशी संपर्क साधला जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती. मात्र, त्याला आता आठवडा होत आला तरी, अद्याप खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही.

- Advertisement -

यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत अजित पवार गटाबरोबरच शिंदे गटावर निशाणा साधला आहे. राज्यात 8 दिवसांपूर्वी 9 नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली. पण अद्याप त्यांना खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. अधिकार आहे, पण जबाबदारी नाही आणि भत्ते आहेत पण काम नाही, अशी त्यांची स्थिती असल्याची टीका त्यांनी अजित पवार गटावर केली आहे. तर, मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, याच्या प्रतिक्षेत वर्षभरापासून खरे गद्दार आहेत आणि मिंधे-भाजपा खोके सरकारच्या दृष्टीने त्यांची किंमत काय आहे, हे लक्षात येते, असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -