घरदेश-विदेशमहाराष्ट्रात आधीच भाजपाची अनेक घोडे व खेचरे ‘बी’ टीम म्हणून... ठाकरे गटाचा...

महाराष्ट्रात आधीच भाजपाची अनेक घोडे व खेचरे ‘बी’ टीम म्हणून… ठाकरे गटाचा BRSवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रात आधीच भाजपाने अनेक घोडे व खेचरे ‘बी’ टीम म्हणून सजवून ठेवली आहेत. त्यात तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (BRS) या आणखी एका पक्षाची भर पडली आहे इतकेच. केसीआर यांच्याकडे धन-संपत्तीची कमी नाही. ते बेफाम वाटप करीत आहेत. त्यानिमित्ताने अडगळीत पडलेल्यांची गरिबी हटणार असेल तर ती त्यांनी खुशाल हटवून घ्यावी, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे. त्याचबरोबर भाजपाचे राजकारण हे सदैव असेच असते. पंढरपूरचा विठोबा हा जागृत आहे. हे सर्व तो उघड्या डोळ्याने पाहतो आहे, चिंता नसावी, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी भारत राष्ट्र समिती असा पक्ष स्थापून राष्ट्रीय राजकारणात येण्याचे नक्की केले. खरं तर त्याची गरज नव्हती. त्यांचा एक प्रादेशिक पक्ष होता व त्यांचे उत्तम चालले होते, पण राष्ट्रीय राजकारणाचा किडा राव यांच्या डोक्यात घुसला तो घुसलाच, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामना दैनिकाच्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

- Advertisement -

तेलंगणात बीआरएसला घसरण
तेलंगणा राज्य स्थापनेत के. चंद्रशेखर राव यांचा संघर्ष मोठा आहे. राव यांनी संघर्ष केला नसता तर तेलंगणा राज्य निर्माण झाले नसते, हे तितकेच खरे. राव हे तेलंगणाचे दोनवेळा मुख्यमंत्री झाले. तेथील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणाऱ्या अनेक योजना त्यांनी यशस्वीरीत्या राबवल्या. तरीही आता त्यांच्या पक्षाला तेलंगणात घसरण लागली आहे व 2024मध्ये केसीआर यांचा पक्ष सत्तेत राहील की जाईल, याची खात्री कोणीच देऊ शकत नाही, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

राजकीय पावले, भाजपाला मदत करणारीच
सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत केसीआर यांच्या कन्या कविता यांचा पराभव झाला. याच कविता यांना दिल्लीतील मद्य घोटाळाप्रकरणी ‘ईडी’ने चौकशीसाठी पाचारण केले. दिल्लीतील ‘आप’चे सरकार व तेलंगणातील काही मद्य ठेकेदार यांच्यात मध्यस्थाची भूमिका कविता यांनी बजावली व त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी ‘केसीआर’ यांच्या कन्येवर चौकशीचा ससेमिरा लावला. केंद्रीय तपास यंत्रणा दबावाचे राजकारण करीत असल्या तरी आम्ही त्यांच्यापुढे झुकणार नाही, लढत राहू, अशी गर्जना केसीआर यांनी केली. मात्र त्यानंतर ते जी राजकीय पावले टाकत आहेत, ती भाजपास अप्रत्यक्ष मदत होईल अशा प्रकारचीच आहेत, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisement -

ओवैसीच्या जागी केसीआर?
तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि 2019 सालापासून भाजपा ज्या ‘एमआयएम’च्या ओवैसींचा वापर मतविभागणीच्या कामासाठी करून घेत आहे, त्या ओवैसी यांचे ‘हेडक्वॉर्टर’सुद्धा हैदराबादच आहे. ओवैसी हे मतांचे विभाजन करण्यासाठी तेव्हा महाराष्ट्रात व इतर राज्यांत गेले. त्यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली, पण आता ओवैसींचा डाव लक्षात आल्याने मुस्लीम व दलित हे एमआयएमच्या कच्छपी लागणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच भाजपाने आता ओवैसी यांच्या जागी केसीआर यांना उतरवले आहे काय? अशी शंका ठाकरे गटाने उपस्थित केली आहे.

केसीआर यांचा भाजपाकडून वापर!
केसीआर व त्यांचा पक्ष भाजपाची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे काय? असा प्रश्न पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीसुद्धा तसे बोलून दाखवले आहे. भाजपाला स्वतःचे विचार व जनाधार नाही. त्यामुळे असे मदारीछाप खेळ करून जिंकायचे हाच त्यांचा मुख्य उद्योग. केसीआर यांचाही वापर त्याच पद्धतीने होताना दिसत आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

नाराज, असंतोषी लोकांसाठी नवे व्यासपीठ
केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाची मोठमोठी होर्डिंग्ज, फलक महाराष्ट्रात लागले. त्यांनी त्यांच्या पक्षाची कार्यालये मराठवाडा व इतर ठिकाणी उघडली. सर्वच पक्षांतील नाराजांना मोठमोठी आमिषे दाखवून ‘खरेदी-विक्री’ संघ उघडला. याबाबत ते ‘खोके’ सेनेस टक्कर देत असल्याने अडगळीत पडलेल्या अनेक पुढाऱ्यांची चलती सुरू झाली. पंढरपुरात काल भारत भालके यांच्या चिरंजीवांनी केसीआर यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. म्हणजे महाराष्ट्रात नाराज व असंतोषी लोकांना केसीआर यांनी नवे व्यासपीठ निर्माण करून दिले, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

भाजपासाठी मतविभागणी
हा पक्ष महाराष्ट्रात निवडणुका लढविणार व जमेल तितकी मतविभागणी घडवून भाजपाच्या राजकारणास सहाय्य करणार हा डाव मऱ्हाठी जनतेने वेळीच ओळखायला हवा. वरकरणी केसीआर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने मतांचा जोगवा मागत आहेत. मात्र त्यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष भाजपासाठी मतविभागणीचे ‘कार्पेट’ अंथरण्याचे काम करेल, असेच एकंदर चित्र आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -