घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीत फूट नाहीच! अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा स्पष्टोक्ती

राष्ट्रवादीत फूट नाहीच! अध्यक्ष शरद पवार यांची पुन्हा स्पष्टोक्ती

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट नाहीच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे पुन्हा एकदा ठणकावून सांगितल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

शनिवारी प्रसारमाध्यमांसमोर शरद पवार यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काही आमदारांनी वेगळी भूमिका मांडली म्हणून पक्ष फुटला असे म्हणता येत नाही. कारण पक्ष म्हणजे आमदार नव्हे. पक्ष म्हणजे काय? फूट याचा खरा अर्थ काय? हे तुम्ही समजूून घ्या. पक्ष म्हणजे आमदार नव्हे, तर पक्ष ही संघटना असते. देश पातळीवर ज्याच्या हाती पक्षाची संघटना पक्ष त्याचा. आता राष्ट्रवादी पक्ष, संघटनेचे अध्यक्ष इथे तुमच्यासमोर बसलेले आहेत. देशाच्या संघटनेचे अध्यक्ष तुमच्यासमोर आहेत. पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील हे आहेत.

- Advertisement -

आमच्यापासून काही आमदार वेगळे झाले ही वस्तुस्थिती आहे, मात्र त्यांनी फक्त पक्षाच्या विचारसरणीहून वेगळी भूमिका घेतली, असे म्हणता येईल. ते आमदार काही पक्षातून फुटून गेले नाहीत. तुम्हीच आठवून बघा ३ महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाची प्रतिक्रिया घेत होतात. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही कोणाची प्रतिक्रिया घेत होतात? तसेच, आमचे काही सहकारी आम्हाला सोडून गेले तेव्हा त्यांची पहिली पत्रकार परिषदही आठवून पहा. पक्षाचा अध्यक्ष शरद पवार असल्याचेच त्यांनी सांगितले होते, असे शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादीत फूट नाही, या शरद पवारांच्या वक्तव्यावर शुक्रवारीही चांगलाच गदारोळ उडाला होता, परंतु शनिवारी पुन्हा एकदा त्यांनी हेच विधान केल्याने याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

- Advertisement -

भाजपला टोला
एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशा पद्धतीने पवारांची वाटचाल सुरू असल्याचे विधान भाजप नेत्यांकडून करण्यात येत असल्याच्या विधानावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मी भाजपसोबत जाणार, असे खुळचटपणाचे वक्तव्य काही पक्षाचे नेतृत्व असलेल्या नेत्यांकडूनच केले जात आहे. मला त्यांना सांगायचे आहे की, ते मूर्खांच्या नंदनवनात राहतात. त्यांचे वक्तव्य अत्यंत खुळचटपणाचे आहे. मी भाजपसोबत जाणार, असे वक्तव्य करून या पक्षाच्या नेतृत्वाची पातळी किती घसरली, हे लक्षात येते, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की अजित पवार मोठे नेते आहेत. तसेच शरद पवारदेखील म्हणाले की, अजित पवार आमचे नेते आहेत. आता तुमचे नेते अजित पवार आहेत, तर मग त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची मान्यता देऊन टाकावी. शरद पवार म्हणतात की मी असे बोललोच नाही, मात्र काही वर्तमानपत्र म्हणतात ही गुगली आहे. त्यामुळे किती गुगल्या टाकणार. प्रत्येक गुगलीवर बॅट्समन आऊट होतो असे नसते. एखादा बॅट्समनदेखील चांगला खेळून जातो.
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -