घरमहाराष्ट्रखांडा भागात झाडांची खांडोळी!

खांडा भागात झाडांची खांडोळी!

Subscribe

वन विभागाची मूक संमती?

शहरात नागरिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे बांधकामाला आड येत असलेली झाडे मुळासकट तोडली जात असून, खांडा भागात वन विभागाच्या कार्यालयाच्या बाजूला इमारती बांधण्यासाठी त्या जागेत असलेली झाडे निर्दयपणे तोडली जात आहेत. त्यामुळे झाडे तोडण्यास वन विभागाची मूक संमती असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने अद्याप त्या जागेवर इमारत बांधण्यास परवानगी दिली नसली तरी खोदकाम मात्र सुरू आहे.

सर्व्हे क्रमांक 1/143, 1/144 या जागेवर इमारती बांधल्या जाणार आहेत. त्यामुळे तेथे असलेली झाडे इमारत बांधण्यास अडथळा ठरत आहेत. ग्रामपंचायतीकडे जागेच्या मालकाने झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती, मात्र ग्रामपंचायतीने वन विभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावित, असे सूचित केले. या जागेपासून हाकेच्या अंतरावर वन विभागाचे कार्यालय असून, त्या ठिकाणी अधिकारी दररोज चार वेळा ये-जा करीत असतात. पण वन विभागाच्या नाकावर टिच्चून त्या जागेतील 100 वर्षे जुनी झाडे कटर मशीन लावून तोडली जात आहेत. हे काम आठवडाभर सुरू असून, आणखी आठ ते दहा दिवस ते चालणार आहे. पण ठेकेदाराला ९० मीटर अंतरावरील वन विभागा कार्यालयाकडून कोणताही अटकाव केला जात नाही.

- Advertisement -

याबद्दल ग्रामपंचायतकडे चौकशी केली असता जागेचे मालक अल्ताफ मुजेद यांचा बांधकाम परवानगीसाठी अर्ज आला आहे, मात्र ग्रामपंचायतीने अद्याप त्या जागेवर बांधकाम परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे वन विभागाच्या संमतीने तेथे झाडे तोडली जात असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे.

कार्यालयाच्या बाजूला असलेल्या जागेतील झाडे इंजायली आहेत. त्यामुळे त्यांचे महत्त्व वन विभागाला नाही. त्यांनी कार्यालयाकडे झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती ती त्यांना दिली आहे. त्यासाठी कोणताही दंड आकारलेला नाही.
-नारायण राठोड, वन अधिकारी

- Advertisement -

स्थानिकांनी घरात सरपण म्हणून सुकलेले झाड तोडले तरी वन विभागाचे कर्मचारी लगेच पोहचतात. मात्र त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला झाडे तोडली जात असताना काहीही कारवाई नाही याचे आश्चर्य वाटते. दुसरीकडे त्यासाठी कोणताही दंड आकारलेला नाही.
-संजय अभंगे, सामाजिक कार्यकर्ते

ग्रामपंचायतीकडे अर्ज आला आहे, पण आम्ही आधी वन विभागाची परवानगी घेऊन झाडे तोडावीत, असे सूचित केले आहे. त्यांना बांधकाम परवानगी दिली नाही, मात्र खोदकाम सुरू केले असल्यास आमचे पथक त्या जागेवर जाऊन माहिती घेईल.
-संजय राठोड, ग्रामविकास अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -