घरमहाराष्ट्रमहापुरुषांच्या अवमानावरून सोशल मीडियावर व्हिडीओ वॉर, विरोधक-सत्ताधाऱ्यांचे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

महापुरुषांच्या अवमानावरून सोशल मीडियावर व्हिडीओ वॉर, विरोधक-सत्ताधाऱ्यांचे एकमेकांकडे अंगुलीनिर्देश

Subscribe

मुंबई – महापुरुषांचा अवमान झाल्याप्रकरणी राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीकडून महामोर्चा तर, भाजपाकडून माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. उद्याच्या मोर्चासाठी आजपासूनच सोशल मीडियावर व्हिडीओ वॉर रंगले आहे. मविआने आपल्या मोर्चाची माहिती देण्याकरता आज एक व्हिडीओ प्रदर्शित केला. तसाच अगदी हुबेहुब व्हिडीओ भाजपानेही सादर करत मविआच्या मोर्चावर टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ काही तासांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल! महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, महापुरुषांच्या सन्मानासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हा! असं आवाहन त्यांनी या व्हिडीओद्वारे केले. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची वादग्रस्त वक्तव्य या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आली आहेत.

- Advertisement -


बाळासाहेब थोरात यांनी हा व्हिडीओ प्रदर्शित करताच दुसऱ्याच तासाला मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून एक व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला. महामोर्च्याच्या व्हिडीओला टीका करण्यासाठी भाजपाने मविआचाच व्हिडीओ कॉपी केला आहे. व्हिडीओ डिझाइन एकसारखी ठेवून मोर्चा कशासाठी? वसुली बंद झाली यासाठी, सत्ता गेली यासाठी, मोर्चा नवाब मलिक अजून आत आहे यासाठी, मोर्चा अफजल खानची कबरचा भाग हटवला यासाठी, मोर्चा मविआपेक्षा जास्त गुंतवणूक आणली यासाठी, मोर्चा विकास काम करतायत यासाठी, मोर्चा जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केलीत यासाठी? असे अनेक प्रश्न या व्हिडीओच्या माध्यमातून विचारण्यात आले आहेत. तसेच, या व्हिडीओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची वादग्रस्ते वक्तव्ये दाखवण्यात आली आहेत.

गेल्या पाच महिन्यांपासून सत्ताधारी-विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगलेला अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यामुळे उद्या दोघांनीही मोर्चा आणि आंदोलनाचे आयोजन केल्याने मुंबई उद्या नेहमीपेक्षा जास्त गजबजलेली दिसेल.

- Advertisement -

महामोर्चा कसा असेल?

मविआकडून आयोजित केलेला महामोर्चाची सुरुवात रिचर्डसन क्रुडास कंपनी, जे . जे . मार्ग ते आझाद मैदानपर्यंत जाणार आहे. सकाळी ९ वाजल्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल. यासाठी ३१७ पोलीस अधिकारी, १८७० पोलीस अंमलदार, राखीव पोलीस दराचे २२ तुकड्या, दंगल नियंत्रक पथक, अश्रुधूर पथक, वॉटर कॅनन, सीसीटीव्ही व्हॅन, राखीव पथके असे मिळून ३० पथके तैनात करण्यात येणार आहेत.

माफी मांगो आंदोलन कसे असेल?

मुंबई भाजपातर्फे उद्या संपूर्ण मुंबईमध्ये “माफी मांगो” आंदोलन दादर स्थानकासमोरील कैलास लस्सी दुकानासमोर सकाळी १०.वाजता होणार आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -