घरमहाराष्ट्रWinter Session : "सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार नसेल तर...", पटोलेंनी सरकारला...

Winter Session : “सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार नसेल तर…”, पटोलेंनी सरकारला सुनावले

Subscribe

नागपूर : राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस हा देखील शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून गाजला. विरोधकांना आज पुन्हा या मुद्द्यावरून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सभागृहात चर्चा करायला तयार नसेल तर या सभागृहातील कामकाजात आणि इतर कोणत्याही चर्चेत रस नाही, अशी भूमिका नाना पटोले यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रश्न उपस्थित करत सरकार चर्चेसाठी तयार आहे, तर मग ती चर्चा पुढे ढकलण्यापेक्षा आजच करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आली. (Winter Session: Nana Patole got angry with the government due to farmers’ questions)

हेही वाचा – Winter Session : ओबीसी विद्यार्थी आणि मागासवर्गीय शाळांचे अनेक प्रश्न प्रलंबित, वडेट्टीवारांकडून प्रश्नांचा भडीमार

- Advertisement -

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटाला तोंड देत असताना राज्य सरकारची भूमिका मात्र वेळकाढूपणाची दिसत आहे. शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची परिस्थिती आली आहे. सरकारकडून फक्त भरपूर देण्यात आले, अशी घोषणा करण्यात येते, पण शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. सरकार सभागृहात चर्चा करण्यास तयार आहे तर मग चर्चा का घेत नाही. सभागृहात आज शेतकरी प्रश्नांवर चर्चा होणार नसेल तर आम्हाला चर्चेत रस नाही. राज्यावर 7 लाख कोटी रुपयांचे कर्ज लादले ते कर्ज शेतकऱ्यांकडूनच वसूल करणार मग शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधानसभेतील चर्चेत शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, शेतकरी प्रश्नांवर सभागृहात आजच चर्चा करण्यात आली पाहिजे. आम्ही शेतकरी, जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी येथे आलो आहोत, गोंधळ घालायला आलो नाही, आम्हालाही गोंधळ घालून कामकाज बंद पाडता आले असते. पण आम्हाला चर्चा करायची आहे. कापूस, धान, संत्रा, सोयाबीन, द्राक्ष, कांदा, दूध उत्पादक शेतकरी कोणीच समाधानी नाही, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावर आजच चर्चा करा. सरकार चर्चा करण्यास तयार आहे, आम्ही तयार आहोत तर मग वेळ कशाला? सरकारने पावसाळी अधिवेशनात 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मागण्या मंजुर केल्या. आता पुन्हा 56 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या आहेत. सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना कोट्यवधींचा निधी दिला जातो आणि विरोधी पक्षांच्या आमदारांकडे दुर्लक्ष केले जाते. विरोधी पक्षाचे आमदार या राज्यातील नाहीत का? आम्ही बाहेरच्या राज्यातून आलो आहोत का? असे प्रश्नही पटोले यांनी यावेळी सभागृहात उपस्थित केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -