घरमुंबईमाथेरानमुळे शिवसेनेत लागलेय उकडायला!

माथेरानमुळे शिवसेनेत लागलेय उकडायला!

Subscribe

माथेरान हे थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून अगदी ब्रिटिश काळापासून मुंबईकरांना परिचित आहे. याच माथेरान नगरपालिकेत भाजपने शिवसेनेचे १० नगरसेवक फोडून शिवसेनेने मुक्ताईनगरात केलेल्या फोडाफोडीचे उट्टे काढले. त्याचबरोबर सत्तेमुळे शिवसेनेत आलेला गारवा पळवून शिवसेना संपर्क नेते आणि परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या खुर्चीखाली शेकोटी पेटवली आहे. या अक्षम्य पडझडीनंतर ज्येष्ठ नेते आणि माजी संपर्क नेते सुभाष देसाई यांच्याकडून हे पद हिसकावून घेणार्‍या अ‍ॅड. परब यांच्या व्यक्तिगत अडचणींनंतर आता राजकीय अडचणीतही वाढ झाली आहे.

शिवसेनेने २०१६ साली माथेरान नगरपालिकेत जनतेतून नगराध्यक्षा निवडून आणल्यावर पक्षाचे १४ नगरसेवक निवडून आले. त्यात दोन स्वीकृत नगरसेवकांची भर पडली. मात्र, माथेरानमध्ये शिवसेनेची ताकद असल्यामुळे पदे आणि विकासकामांचे ठेके यामुळे सगळा सत्तेचा मलिदा खाण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. याठिकाणी महेंद्र थोरवे हे आमदार आहेत. महिला संपर्क प्रमुख मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत. तर कर्जतच्या रेखा ठाकरे या जिल्हाप्रमुख आहेत. संपर्क नेतेपदाची जबाबदारी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे आहे. पालकमंत्री म्हणून अनिल परब हे या ठिकाणी काम पाहतात.

- Advertisement -

या भागात आदेश बांदेकर संघटनात्मक पातळीवर साफ अपयशी ठरल्यावर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यांना म्हणावा तसा प्रभाव पाडता न आल्याने खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी माजी महापौर दत्ता दळवी यांच्याकडे सूत्रे सोपवली. आता सुभाष देसाई यांच्याकडून संपर्क नेतेपद काढून घेत ते अनिल परब यांनी बेमालूमपणे स्वतःसाठी मिळवून घेतले. मात्र, संघटना आणि नगरपालिका यातील पदे, सत्ता आणि मलिद्यासाठी इथे खूपच हेवेदावे आणि संघर्ष असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी वारंवार पक्ष नेतृत्वाला सांगितले. याबाबत दोन बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पर्यटन विकासासाठी येणार्‍या निधीच्या ठेक्यातून हा संघर्ष चिघळला.

परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे कॅबिनेट मंत्री पदाबरोबरच मुंबईतले विभागप्रमुख पद, रत्नागिरी आणि रायगडचे पालकमंत्री पद, मुंबईतील विभाग प्रमुखांच्या समन्वयाची जबाबदारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या थिंकटँकचे कामकाज अशा अनेक जबाबदार्‍या आहेत. माथेरानमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांसह पदाधिकारी धुवून नेणार्‍या भाजप नेत्यांनी पक्षकलहाचा योग्य फायदा उठवत थेट कोल्हापूरमध्ये या नगरसेवकांना नेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच सुरुंग लावला. या नगरसेवकांना थेट पाच जिल्हे पार करून कोल्हापुरात नेईपर्यंत पोलीस गुप्तचर विभागालाही खबर लागली नाही. यावरून मुख्यमंत्री ठाकरेंच्या गुप्तवार्ता विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

माथेरान प्रकरणामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे प्रचंड संतापले आहेत. या सगळ्याला कोण जबाबदार याचा शोध सुरू झाला आहे. तर दुसरीकडे पक्षाचे डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. त्यासाठी आणि पक्ष कार्यकर्त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी महापौर किशोर पेडणेकर रविवारी माथेरानचा दौरा करणार आहेत. या अत्यंत मानहानीकारक प्रकरणाचे खापर सुभाष देसाई यांच्यावर फोडण्यासाठी अनिल परब यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर आपल्या क्षमतेपेक्षा न झेपणारी पदे घेऊन अनिल परब पक्षाचे कसे नुकसान करत आहेत, याकडे लक्ष वेधण्यासाठी सुभाष देसाई समर्थक आक्रमक झाले आहेत.

सुभाष देसाई आणि अनिल परब या उध्दव ठाकरेंच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्यांना माथेरानसारखी नगरपालिका टिकवता आली नाही. त्याचवेळी इथले पक्षीय वाद मिटवण्यात हे महत्वाचे नेते अपयशी ठरल्यामुळे थंड हवेसाठी ओळखल्या जाणार्‍या माथेरानात शिवसेनेला उकाड्याचा सामना करावा लागत आहे. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, यात भाजपचे काही राजकीय कौशल्य नाही. आमच्यामध्ये जे अंतर्गत वाद होते ते आम्हाला यशस्वीपणे मिटवता आले नाहीत. भाजपने तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घेतली. लोकप्रतिनिधींनी पक्ष सोडलाय; पण निष्ठावंत कार्यकर्ते अजून पक्षातच आहेत. त्यांना आम्ही पुन्हा एकत्र करू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -