घरमुंबईचार महिन्यात अत्याचाराच्या १८ घटना

चार महिन्यात अत्याचाराच्या १८ घटना

Subscribe

कुठल्याच वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत

यंत्रमागाचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडी शहरात मागील चार महिन्यात बलात्काराच्या घटनांनी टोक गाठले आहे. बालिका, अल्पवयीन, तरुण महिला त्याला बळी पडत आहेत. ‘भय इथले संपत नाही….बलात्कारांची भिवंडी ’ या वृत्तमालिकेत अशा घटनांचा मागोवा घेतला जाणार आहे. अगदी अत्याचाराची तक्रार करायला पोलीस ठाण्यात गेलेल्या महिलेवरही पोलीस उपनिरीक्षकाकडून अत्याचार झाल्याची लाजिरवाणी घटना घडल्याने कायद्याचे रक्षकच महिलांचे भक्षक बनल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारांवर प्रकाशझोत टाकणारे हे वृत्तांकन

यंत्र, हातमाग आणि कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले भिवंडी शहर आता अत्याचारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. महिला, लहान मुलींवरील लैंगिक अत्याचारांच्या संख्येने या भागात कळस गाठला आहे. मुली, तरुणींचे अपहरण, विनयभंग अशा घटना वाढल्याने या शहरातील महिला वर्गात भीती पसरली आहे. यंदाच्या वर्षातील मागील चार महिन्यात भिवंडी शहरात अत्याचारांच्या तब्बल 18 घटना घडल्या आहेत. त्यामध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीपासून ते 50 वर्षीय महिलांपर्यंतच्या पीडितांचा समावेश आहे.

- Advertisement -

महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेल्या उपाययोजना कमी पडत आहेत. त्यामुळे अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात हे उपाय वाढवण्याची गरज आहे. धक्कादायक म्हणजे 18 बलात्कारांच्या घटनांमध्ये 4 ते 16 वर्षातील अल्पवयीन पीडितांची संख्या 6 अशी आहे. तसेच 4 पीडिता विवाहिता आहेत. तर खळबळजनक बाब म्हणजे 1 पीडित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. तर ज्या पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार झालेल्या पीडितेच्या तपासाची जबाबदारी होती. त्याच पोलीस उपनिरीक्षकाने पीडितेवर बलात्कार करून रक्षक हेच भक्षक झाल्याने न्याय कुणाकडे मागावा, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस अद्याप फरार आहे.

नवीन वर्षात तब्बल 18 बलात्कारांच्या घटना घडल्या असल्याने नव्या वर्षातही इथले भय संपलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राजकीय, सरकारी तसेच सामाजिक, महिलांसाठी काम करणार्‍या संस्थांनी या वाढत्या अत्याचारांविषयी काम करण्याची गरज आहे.

- Advertisement -

मागील वर्षातल्या डिसेंबर महिन्यातील घटना ,
भोंदू वैद्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

1 ) दाढदुखीचे गावठी औषध देण्याच्या बहाण्याने एका भोंदू वैद्याने त्याच्या साथीदाराच्या मदतीने पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी भोंदू वैद्याच्या बलात्कारामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कारी भोंदू वैद्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. पंकज गोस्वामी (42) असे अटक केलेल्या आरोपी भोंदू वैद्याचे नाव आहे.

2 ) चार वर्षीय चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर 19 वर्षाच्या आरोपीने बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना भिवंडीतील नेहरूनगर नवीवस्ती येथे घडली आहे. पोलिसांनी त्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहे. तौहीद रेहमान शेख (19 रा. नेहरूनगर नवीवस्ती) असे चिमुरडीवर अत्याचार करणार्‍या नराधमाचे नाव आहे.

3) चार वर्षीय चिमुरडी आपल्या राहत्या घरातील खोलीत खेळत असताना एका 30 वर्षीय आरोपीने तिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर नेऊन अत्याचार केला. ही घटना भिवंडी शहरातील नागांव येथील बरकत रेसिडेन्सी इमारत येथे घडली आहे. चार वर्षीय चिमुरडी आपल्या घरात खेळत असताना आरोपीने तिला इमारतीच्या सहाव्या मजल्यावर बळजबरीने नेले आणि अत्याचार केला.

4) एका कार चालकाकडून लिफ्ट घेणे नालासोपार्‍यात राहणार्‍या 23 वर्षीय तरुणीला भलतेच महागात पडले होते. या नराधमाने प्रवासात पीडित तरुणीशी ओळख करून नोकरीचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कोनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. राजू हसन पटेल (30 रा. धुळे) असे फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो सध्या कारागृहात शिक्षा भोगत आहे.

जानेवारीत घडलेल्या बलात्कारांच्या घटना

1 ) वडिलांच्या खानावळीत जेवण करण्यासाठी येणार्‍या 20 वर्षाच्या आरोपीने 13 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेडरूममध्ये शिरून गुंगी येणारे औषध लावलेला रुमाल नाकावर धरून बलात्कार केल्याची घटना घडली होती. ही घटना भिवंडीतील मार्कंडेयनगर, पद्मानगर परिसरात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पीडिता 2 महिन्यांची गरोदर असल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अंजलीकुमार पटेल (20 रा.कामतघर) असे आरोपीचे नाव आहे. तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची कुणकूण लागताच आरोपी नराधम फरार झाला होता.

2 ) 28 वर्षीय ब्युटिशियन तरुणीला 24 वर्षीय दगाबाजाने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. खळबळजनक बाब म्हणजे अत्याचारामुळे पीडितेला गरोदर ठेवून तो पसार झाला होता. खुर्शीद अहमद खान (24 रा. अँटॉप हिल) असे दगाबाजाचे नाव आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दगाबाज खुर्शीदविरोधात कोनगांव पोलीस ठाण्यात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र अद्यापही नराधम फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

3 ) 23 वर्षीय तरुणीशी ओळख निर्माण करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर एका झायलो कारमध्ये प्रेयसीशी निकाह रचल्याचा बनाव करून दगाबाज प्रियकराने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पीडित तरुणीच्या जबानीनुसार शांतीनगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह अन्य कलमानुसार दगाबाज प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेऊन त्याला गजाआड केले आहे. अजहर अन्सारी (28, रा. गुलजारनगर) असे दगाबाज प्रियकराचे नाव आहे.

4 ) एका 25 वर्षीय विवाहितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 27 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पीडिताने कोनगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन नराधमाविरोधात बलात्कारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अविनाश माळी ( 27 रा. कांबा ता. भिवंडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

5 ) पतीपासून विभक्त राहणार्‍या 22 वर्षीय विवाहित महिलेचा फायदा घेत, तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 21 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पीडितेने शांतीनगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अबू हाशिम नूर मोहम्मद शहा (21 रा. पिराणी पाडा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

6 ) 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत, 4 नराधमांपैकी दोघांनी बलात्कार केला. तर 2 नराधमांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. शांतीनगर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून 3 नराधमांना बेड्या ठोकल्या तर 1 आरोपी फरार झाला होता. जमील उर्फ भुल्लन वली मोहमंद खान (58) शहानवाज खान (19) रिजवान खान (23) अशी तिघा अटक नराधमांची नावे असून फिरोज सिद्दीकी हा फरार झाला होता. मात्र पोलिसांनी त्यालाही बेड्या ठोकल्या.

7 ) प्रियकराच्या डोक्याला पिस्तूल लावत पाच आरोपींनी 20 वर्षीय प्रेयसीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. ही घटना भिवंडी नजीक निर्जनस्थळ असलेल्या पोगांव पाईपलाईन येथे घडली होती. विशेष बाब म्हणजे नराधमांच्या मातीवर उमटलेल्या पाऊल खुणांचा भिवंडी तालुका पोलिसांनी शोध घेऊन या 5 नराधमांना गजाआड केले आहे. किशोर रघुनाथ लाखात (19) गुरुनाथ गोपाल बारी (23 रा.येवई ), हर्षद हिरामण मटले (19 रा. चावींद्रा), अविनाश पुंडलिक जाधव (24 रा. शेलार), गणेश पवार (20 रा. शेलार) असे गजाआड केलेल्या नराधमांची नावे आहेत.

8 ) एका दगाबाज प्रियकराने लग्नाच्या पूर्वीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 32 वर्षीय विवाहितेवर तिच्या राहत्या घरात बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पीडित विवाहितेने भिवंडी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. परवेज असे गुन्हा दाखल केला होता.

10 ) महापालिकेच्या वसाहतीमध्ये राहणारी 50 वर्षीय महिला एकटीच घरात टीव्ही पाहत बसलेली होती. ती घरात एकटी असताना शेजारी राहणार्‍या नराधमाने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. या घटनेप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने गुन्हा दाखल करताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आनंद शिवराम घाडगे (50 रा. कोंडा शेठ यांची बिल्डिंग) असे आरोपीचे नाव आहे.

11 ) 20 वर्षीय तरुणीवर गायत्रीनगर इथे अत्याचार

12 ) 27 वर्षीय महिलेवर पिंपळास भागात बलात्कार

13 ) 22 वर्षीय महिलेवर नारपोली भागात अत्याचार

14 ) 16 वर्षीय युवतीवर रामनगर भागात अत्याचार

15) 2 शाळकरी अल्पवयीन मुलींवर फेना पाडा भागात अत्याचार

16 ) 4 वर्षीय चिमुरडीवर ब्राह्मानंद नगर भागात 18 वर्षीय तरुणाचा बलात्कार

बलात्काराच्या गुन्ह्यातील पोलीस उपनिरीक्षक मोकाटच

पोलिसानेच महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. तरीही संबंधित पोलीस आरोपी मोकाटच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. रोहन गोंजारी असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -