घरमुंबईसामूहिक बलात्कार प्रकरणी दोघांना २० वर्ष कारावास

सामूहिक बलात्कार प्रकरणी दोघांना २० वर्ष कारावास

Subscribe

पायधुनी येथे एका २७ वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोहम्मद फारुख अब्दुल लतीफ खान आणि संतोष रामसागर कनोजिया अशी या दोघांची नावे आहेत

पायधुनी येथे एका २७ वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना वीस वर्षांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मोहम्मद फारुख अब्दुल लतीफ खान आणि संतोष रामसागर कनोजिया अशी या दोघांची नावे आहेत. पीडित महिला ही २७ वर्षांची असून ती मूळची उत्तर प्रदेशची रहिवाशी आहे. मार्च २०१७ रोजी ती मुंबईत आली होती. तिला नोकरीची गरज होती. मुंबईत हमखास नोकरी मिळेल म्हणून ती तिच्या परिचित संतोष कनोजिया याच्या घरी भिवंडी येथे काही दिवसांपासून राहत होती. याच दरम्यान, संतोष तिला घेऊन पायधुनी येथील झकेरिया स्ट्रिट, सुरंगी मेन्शन इमारतीमध्ये घेऊन आला होता. याच इमारतीमध्ये फारुख खान हा राहत असून तो तिला नोकरी मिळवून देईल असे संतोषने तिला सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून ती त्याच्यासोबत आली होती.

सुटकेसाठी घरातून मारली उडी

मात्र या दोघांनी रात्री उशिरा तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देत हा प्रकार कोणालाही सांगू नकोस असे सांगितले होते. या दोघांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी तिने फारुखच्या घरातून उडी मारली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. पहाटे चार वाजता एका व्यक्तीला एक महिला पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने पायधुनी पोलिसांना ही माहिती दिली.

- Advertisement -

जखमी अवस्थेत पोलिसांना सापडली

या माहितीनंतर पायधुनी पोलिसांच्या एका विशेष पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. या महिलेला पोलिसांनी तातडीने जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तिच्या जबानीनंतर सामूहिक बलात्काराचा हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तिच्या जबानीवरुन पायधुनी पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध सामूहिक बलात्कारासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच काही तासांत फारुख खान आणि संतोष कनोजिया या दोघांना पोलिसांनी अटक केली.

२० वर्षांचा कारवास

संतोष आणि पीडित महिला एकाच गावचे रहिवाशी असून लहानपासून ते दोघेही एकमेकांच्या परिचित होते. फारुखचे तिथे घर तसेच एक गोदाम आहे. ही महिला एकटी असल्याने या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. याच गुन्ह्यात या दोघांविरुद्ध विशेष सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले होते, या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. त्यानंतर त्यांना सामूहिक बलात्काराच्या दोन वेगवेगळ्या कलमांतर्गत प्रत्येकी वीस  वर्षांच्या कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पोलिसांचे कौतुक

दोन्ही आरोपींना शिक्षा होण्यासाठी त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम पुरावे सादर केले होते, या पुराव्यासह साक्षीदारांच्या जबानीवरुन दोन्ही आरोपींना शिक्षा झाल्याचे सांगण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कानाडे यांच्या पथकातील महिला पोलीस निरीक्षक भागवत, उपनिरीक्षक अतुल बनकर, पोलीस शिपाई संदीप कांबळे यांनी या गुन्ह्यांचा तपास केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -