घरताज्या घडामोडीOmicron Variant: मुंबईकरांनो काळजी घ्या! आज ३ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद

Omicron Variant: मुंबईकरांनो काळजी घ्या! आज ३ नव्या ओमिक्रॉनबाधितांची नोंद

Subscribe

मुंबईत ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव हळूहळू वाढत आहे. आज मुंबई क्षेत्रात ३ नव्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५वर पोहोचली आहे. महत्त्वाचे म्हणजे आज दाटीवाटीचा परिसर असलेल्या धारावीत आज पहिल्या ओमिक्रॉनच्या रुग्णाची नोंद झाली आहे. त्यामुळे आता मुंबई प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान आज आढळलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत. तसेच खबरदारीची उपाययोजना म्हणून संबंधित रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

आज आढळलेल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा प्रवास….

आज आढळेल्या मुंबईतील तीन रुग्णांपैकी एक रुग्ण ४८ वर्षांचा पुरुष आहे. हा रुग्ण टान्झानिया येथून ४ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. त्यांची ०४ डिसेंबरला चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये सदर व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीकरण शिल्लक आहे. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. तसेच सदर रुग्णाच्या अतिजोखमीच्या संपर्कातील २ सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यापैकी कोणीही कोविडबाधित नाही.

- Advertisement -

आज आढळलेला दुसरा ओमिक्रॉनबाधित रुग्ण २५ वर्षांचा पुरुष आहे. लंडन येथून १ डिसेंबर २०२१ रोजी भारतात आला होता आणि त्याची कोविड चाचणी बाधित आल्याने त्याचा वैद्यकीय नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाचे कोविड लसीचे दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. तसेच सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. सदर रुग्णाच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी कोणीही कोविडबाधित नाही.

तिसरा ओमिक्रॉनबाधित हा ३७ वर्षीय पुरुष (गुजरातचा रहिवासी) आहे. दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर २०२१ रोजी आला होता. ज्याची कोविड चाचणी केली असता रुग्णास कोविडची बाधा झाल्याचे निदर्शनास आल्याने सदर नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. सदर रुग्णाच्या कोविड लशीच्या दोन्हीही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. सदर रुग्णाला खबरदारीची उपाययोजना म्हणून विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Variant: देशात आतापर्यंत २५ ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद; सरकारने दिला इशारा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -