घरमुंबईउद्यानांच्या विकासासाठी केलेला ४६ लाखांचा खर्च मातीमोल

उद्यानांच्या विकासासाठी केलेला ४६ लाखांचा खर्च मातीमोल

Subscribe
शिवडीतील वेस्टर्न इंडिया मिलमधील उद्यानासाठीची जमीन महापालिकेला प्राप्त झाल्यानंतर या जमिनीवर उद्यानाचा विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या उद्यानाच्या विकासासाकरिता महापालिकेने त्यावर तब्बल ४६ लाख रुपये खर्चही केले. परंतु, आता हीच जमीन महापालिका गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला देणार असल्याने यावर केलेला खर्च मातीमोल ठरला आहे.
सूतगिरण्यांच्या पुनर्विकासात वेस्टर्न इंडिया मिलमधील ३६०७.८६ चौरस मीटरची जागा महापालिकेला उद्यान विकासासाठी प्राप्त झाली आहे. परंतु, ही जागा म्हाडाला देऊन त्याबदल्यात त्यांच्या ताब्यातील एकूण ३८७३.८१ चौरस फुटांचे सहा भूखंड महापालिका ताब्यात घेणार आहे. म्हाडा आणि महापालिका यांच्यात सूतगिरण्यांच्या जागांची अदलाबदल होत असली तरी त्यामध्ये महापालिकेने आपल्या ताब्यातील भूखंडावर उद्यानांच्या विकासासाठी  ४६.७१ लाखांचा खर्च केला आहे. या भूभागावरील झाडेझुडपे काढणे आणि जमिनीचे सपाटीकरण करणे यासाठी हा खर्च करण्यात आला आहे.
महापालिकेच्या ताब्यातील भूखंड मोकळा असला तरी म्हाडाच्या ताब्यातील सहा भूखंडांची योग्य निगा राखलेली नाही. यापैंकी काही भूखंडावर स्थानिक रहिवाशांची वाहने उभी केली जातात. शिवाय संरक्षक भिंत, फाटक, नामफलक, मल:निसारण आदी काहीच नाही. याबरोबरच या भूभागांवर झाडेझुडपे आणि डेब्रीस टाकलेले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे म्हाडाच्या ताब्यातील ६ भूभागांपैकी ४ भूभागांची मिळकत पत्रिका म्हाडाच्या नावे झालेली आहे. तर, मफतलाल मिल आणि व्हिक्टोरिया मिल या दोन भूभागांची पत्रिका म्हाडाच्या नावे झालेली नाही.  या दोन्ही भूभागांची मिळकत पत्रिका व  मोजणी नकाशा सादर करण्याच्या अटींवरच अदलाबदलीस मान्यता दिली जाणार असून, सहा गिरण्यांच्या जमिनीवर गवत तथा झुडपे काढण्याचे काम हाती घेऊन ते मोकळे करून दिले जातील,असे आश्वासन म्हाडाने दिल्याचे महापालिका मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त पराग मसुरकर यांनी स्पष्ट केले.
म्हाडाचे ४ कोटींचे नुकसान 
महापालिका म्हाडाला ३६०७.८३ चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा देणार आहे. तर, म्हाडा महापालिकेला ३८७३.८३चौरस मीटरचे सहा भूखंड देणार आहे. त्यामुळे महापालिकेला २६५.९८ चौरस मीटरची जागा अधिक मिळणार आहे. ताब्यातील ६ भूखंडांची बाजारभावानुसार ६७.३८ कोटी रुपये एवढी किंमत आहे. तर, महापालिकेच्या ताब्यातील भूखंडाची किंमत ६३.०५ कोटी रुपये एवढी आहे. त्यामुळे दोन्ही भूखंडांच्या किमतीत ४.३३ कोटी रुपयांचा फरक आहे. महापालिकेला एकाच मोठ्या भूखंडाच्या बदल्यात सहा ठिकाणी भूखंड मिळत आहेत. परंतु, या ४.३३ कोटी रुपयांच्या फरकाची रक्कम म्हाडाला देण्याची गरज नाही. महापालिकेने आपल्या ताब्यातील भूखंडावर ४५ लाख रुपये खर्च केला असला तरी २६५.९८ चौरस मीटरची जागा अधिक मिळणार आहे. शिवाय जो खर्च केला आहे, तो झाडेझुडपे इतर डेब्रीज काढण्यासाठीच. त्यामुळे म्हाडाला भूखंड देताना तो मोकळा करूनच द्यावा लागला असता. त्यावर महापालिकेला हा खर्च करावा लागता असता,असे महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -