घरमुंबईपश्चिम रेल्वेवरील ८७ एटीव्हीएम मशीन बंद

पश्चिम रेल्वेवरील ८७ एटीव्हीएम मशीन बंद

Subscribe

पश्चिम रेल्वेवरील ८७ एटीव्हीएम मशिन एकाचवेळी बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना तिकिटांसाठी पुन्हा एकदा खिडक्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.

मुंबई : तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी, यासाठी पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते डाहणूपर्यंतच्या रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या ‘एटीव्हीएम’ मशीन्सचा बोजवारा उडाला आहे. पश्चिम रेल्वेवरील ८७ एटीव्हीएम मशिन एकाचवेळी बंद पडल्या आहेत. यामुळे प्रवाशांना तिकिटांसाठी पुन्हा एकदा खिडक्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.

पश्चिम रेल्वेचा विस्तार हा चर्चगेटपासून ते डाहाणूपर्यंत झाला आहे. या मार्गावरून दिवसाला सुमारे ३० ते ३५ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सेवेसाठी पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकात एटीव्हीएम मशीन बसवण्यात आल्या आहेत. प्रवाशांना स्मार्ट कार्डद्वारे या मशीनमधून तिकीट घेता येते. यामुळे वेळेची बचत होतेच शिवाय अतिरिक्त मानवी दिवसही टळतो. मोबाईल तिकिटाची प्रतही या मशिनमधून मिळते. मात्र मागील काही महिन्यापासून या एटीव्हीएममध्ये सतत बिघाड आणि तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे प्रवाशांना समस्यांना समोरे जावे लागत आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील स्थानकांवर एकूण ४५७ एटीव्हीएम मशीन बसवण्यात आल्या होत्या. मात्र त्यापैकी ३७० मशीनच सुरू असून, उरलेल्या मशीन बंद पडल्या आहेत.

- Advertisement -

यातीलही २० ते ३० मशिनमध्ये सातत्याने बिघाड होतो. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. चर्चगेट, दादर, बांद्रा, मुंबई सेंट्रल, अंधेरी, सांताक्रुजपासून अगदी विरारपर्यंतच्या रेल्वे स्थानकात सर्वाधिक एटीव्हीएमचा वापर होतो. या स्थानकांवर नव्या मशिन बसविण्याची आवश्यकता आहे. मात्र रेल्वेकडून कसल्याही प्रकारची उपायोजना होत नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वेच्या डिजिटल व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचीच ही लक्षणे असल्याचे बोलले जात आहे. पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वेवर सध्या अतिरिक्त १५० एटीव्हीएम मशिन्सची गरज आहे. रेल्वे आणि एटीव्हीएम मशीन बनविणार्‍या कंपनीबरोबर पश्चिम रेल्वेचा करार संपल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रवाशांचे हाल …

प्रभादेवी रेल्वे स्थानकांवरील अवघी दोन यंत्रे सुरू आहेत. त्यामुळे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या यंत्रांची योग्य देखभाल होत नसल्याने ती यंत्रे वारंवार बंद पडतात. गेल्या दोन महिन्यांपासून प्रभादेवी रेल्वे स्थानकात सातत्याने ही यंत्रणा बंद पडत असल्याने प्रवासी हैराण आहेत. एटीव्हीएम यंत्रणा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दीचा सामना करावा लागतो,असे राखी पाटील या प्रवाशी महिलेने सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून प्रभादेवी रेल्वे स्थानकातील निम्म्यापेक्षाही अधिक यंत्रे बंद अवस्थेत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही यंत्रणा चालविण्यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -