घरमुंबईअनधिकृत बांधकामांबाबत मनपा उदासीन

अनधिकृत बांधकामांबाबत मनपा उदासीन

Subscribe

लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरू

उल्हासनगर शहरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई गेल्या काही दिवसांपासून जवळजवळ थांबलेली आहे. याप्रकरणी अ‍ॅड. शहा यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असता त्यांनी चौकशी सुरू केली असल्याची माहिती दिली. दुसरीकडे काँग्रेस पक्षानेदेखील अनधिकृत बांधकामविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेत मनपा क्षेत्रामध्ये असलेल्या चार प्रभाग समितीमध्ये अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण व्हावे म्हणून प्रत्येक प्रभागात सहाय्यक आयुक्त नेमण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे या सर्व सहाय्यक आयुक्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिक्रमण निष्कासन प्रमुख म्हणून गणेश शिंपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, असे असूनसुद्धा पालिका क्षेत्रात बोगस नकाशे सादर करून रिस्क बेस प्लॅनच्या नावावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे केली जात असल्याचा आरोप अ‍ॅड. सतीश शहा यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी मनपा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यानंतर शहा यांनी राज्य लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली असता प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. लोकायुक्तांनी शहा यांच्याकडे सर्व लेखी तक्रारी 20 एप्रिल 2019 पर्यंत सादर करण्यास सांगितल्या असून, त्यानंतर महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

दुसरीकडे ‘शहरातील अनधिकृत बांधकामांना अतिक्रमण निष्कासन प्रमुख गणेश शिंपी हेच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस शहरजिल्हा अध्यक्ष राधाचरण करोतिया यांनी केला आहे. शिंपी यांना काही वर्षांपूर्वी अनधिकृत बांधकामाच्या संदर्भात लाच घेताना पोलिसांनी पकडले होते. यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हादेखील दाखल झाला आहे. असे असतानाही त्यांच्याकडे अतिक्रमण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिंपी यांच्याकडून तत्काळ तो पदभार काढण्यात यावा’ अशी मागणी करोतिया यांनी केली असून, यासंबंधी लेखी निवेदन मनपा आयुक्त अच्युत हांगे यांना दिले आहे.

यासंदर्भात गणेश शिंपी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोपाचे खंडन केले आहे. ते म्हणाले की ‘माननीय लोकायुक्त यांचे कोणतेही पत्र आम्हाला प्राप्त झालेले नाही, तसेच काँग्रेस पक्षाची तक्रारदेखील आम्हाला अद्याप प्राप्त झालेली नाही’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -