घरमुंबईतब्बल ४५ वर्षांनंतर टॅक्सी चालकाची निर्दोष सुटका

तब्बल ४५ वर्षांनंतर टॅक्सी चालकाची निर्दोष सुटका

Subscribe

एका दिर्घकाळ चाललेल्या खटल्यात माझगाव कोर्टाने गेल्या आठवड्यात एका टॅक्सी चालकाची तब्बल ४५ वर्षांनंतर निर्दोष सुटका केली. या टॅक्सी चालकावर ट्रक चालकाला मारहाण केल्याचा आरोप होता. अपुरी कागदपत्रे आणि केवळ एकाच साक्षीदाराची साक्ष यामुळे आरोपी टॅक्सीचालक गाची अल्लारखा यांना दोषी ठरवता येणार नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. याच प्रकरणातील दुसऱ्या आरोपीवर मात्र वेगळा खटला चालवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

तक्रारदार – टॅक्सीचालकाचा वाद 

तक्रारीची प्रत, स्पॉट पंचनामा, वैद्यकीय चाचणी ही खटल्याशी संबंधित कागदपत्रे उपलब्ध झालेली नाहीत. इतकेच नाही तर आरोपपत्र ही फाटलेल्या अवस्थेत आहे, असे कोर्टाने नोंदवले. न्यायालयाने पोलिसांना अन्य आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. ही घटना, तब्बल ४५ वर्षांपूर्वी म्हणजे ३० जानेवारी १९७३ रोजी मुंबईतील पायधुनी भागात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या दिवशी संध्याकाळी ४.३० वाजता चप्पलांनी भरलेला एक ट्रक पायधुनीत घटनास्थळी आला. त्यातून माल उतरवण्यात येणार होता. मात्र जेथे चप्पलांचे खोके उतरवून ठेण्यात येणार होते तेथे आरोपी अल्लारखा याची टॅक्सी उभी होती. तक्रारदार जाफर हसन यांचा पुतण्या जमील उल रेहमान याने टॅक्सी चालक अल्लारखाला आपली टॅक्सी तेथून हलवण्यास सांगितली. त्यामुळे टॅक्सीचालक आणि जमील यांच्यात वाद झाला.

- Advertisement -

टॅक्सीचालक घटनास्थळावरून पसार


टॅक्सी चालकाने जमील याला शिवीगाळ केली. त्यामुळे जमील याने टॅक्सी चालकाची कॉलर पकडली. तुला चांगलाच धडा शिकवतो, असे सांगून टॅक्सी चालक घटना स्थळाहून निघून गेला. त्यानंतर आरोपी गाची अल्लारखा आणि अब्दुल कासम घटनास्थळी आले. त्यांच्या हातात लोखंडाचा पाईप होता. तक्रारदार आणि ट्रक चालक माल उतरवत असताना टॅक्सी चालक अल्लारखा आणि कासम यांनी त्यांच्याशी भांडण उकरून काढले. तसेच लोखंडी पाईपने हल्ला करून जमील आणि अजून एक इसम, रईस अहमद याला जखमी केले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले.

जमील आणि रईसला जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अल्लारखा आणि कासम यांना अटक करण्यात आली. अल्लारखा आणि कासमवर माझगाव कोर्टात खटला उभा राहिला. या खटल्यादरम्यान, फक्त वैद्यकीय अधिकाऱ्याची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र एकाही प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवण्यात आली नाही.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -