घरमुंबईमुंबईतील घटनेनंतर ठाणे पालिकेला जाग

मुंबईतील घटनेनंतर ठाणे पालिकेला जाग

Subscribe

हॉस्पिटलच्या अग्निशमन यंत्रणेची होणार तपासणी

मुंबईतील कामगार हॉस्पिटलला लागलेल्या आगीनंतर सरकारी हॉस्पिटलांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे व कल्याण, डोंबिवलीतील सरकारी हॉस्पिटल्समध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असून फायर ऑडिट झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र मुंबईच्या घटनेनंतर ठाणे महापालिकेला जाग आली असून शहरातील ३८४ खासगी हॉस्पिटल्सची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासणीचा निर्णय पालिकेच्या अग्निशमन दलाने घेतला आहे.

राज्य शासनाचे ठाणे जिल्हा शासकीय हॉस्पिटल (सिव्हील) आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील कोनाकोपर्‍यातून रूग्ण या ठिकाणी तपासणीसाठी येतात. दररोज साधारण १००० ते १२०० बाह्यरूग्ण येत असतात. सिव्हील हॉस्पिटलची इमारत ही ब्रिटीशकालीन असल्याने इमारतींच्या आतील भागाची पडझड झाली आहे. मात्र अशाच अवस्थेत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.सिव्हिल हॉस्पिटल स्थलांतर करण्यात येणार असून या ठिकाणी अत्याधुनिक सोयी सुविधांनीयुक्त अशी नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. मात्र हॉस्पिटलसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने हॉस्पिटलचे स्थलांतर होऊ शकलेले नाही. रूग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेचे नुकतेच फायर ऑडिट करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये अपुरी अग्निशमन रोधक यंत्रणा असल्याचे दिसून येते. ठाणे महापालिकेचे कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये हजार ते १२०० रूग्ण दररोज तपासणीसाठी येत असतात. हॉस्पिटलमधील अग्निरोधक यंत्रणेचे नुतनीकरण करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये अग्निरोधक यंत्रणेचे फायर ऑडिट केल्याचे हॉस्पिटल प्रशासनाचे म्हणणे आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे कल्याणात रूक्मिणीबाई हॉस्पिटल व डोंबिवलीत शास्त्रीनगर हॉस्पिटल ही दोन मोठी हॉस्पिटल्स आहेत. या हॉस्पिटलातही कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून येणार्‍या रूग्णांची संख्या मोठी आहे. दररोज हजार ते बाराशेच्या आसपास रूग्ण तपासणीसाठी येतात. हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर आणि अपुरी यंत्रसामुगी असल्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून नेहमीच केली जाते. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या रूग्णांना ठाणे मुंबईतील हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. शास्त्रीनगर हॉस्पिटलात नवीन अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आली असून रूक्मिणीबाई रूग्णालयात लवकरच नवीन यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाणे महापालिका हद्दीत एकूण ३८४ खासगी हॉस्पिटल असून येथील अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली असून सर्व हॉस्पिटलची अग्निशमन यंत्रणा तपासून ३१ डिसेंबरपूर्वी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे.

- Advertisement -

हॉस्पिटलमधील फायर ऑडिट करण्यात आले असून अग्निरोधक यंत्रणाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. नवीन अग्निरोधक यंत्रणेच्या खरेदीच्याही सूचना संबधित विभागाला देण्यात आल्या आहेत. – डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल रूग्णालय, ठाणे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -