मुलांच्या अंथरुणावरील रजई, उशी,बाहुली ठरू शकते घातक

Baby Sleeping

अनेक लहान मुलांना झोपताना शाल, बाहुली, टेडी बेअर यातील एखादे जवळ घेऊन झोपायची सवय असते. अनेक पालकांना असे वाटते की, मुलांना जाड अंथरुणावर झोपवल्यास चांगली झोप लागेल; पण, यामुळे मुलांना श्वासोच्छवास करण्यास त्रास होऊ शकतो. एका संशोधनानुसार रात्री झोपताना मुलांजवळ खेळणी, मोठी रजई, मोठी उशी ठेवणे योग्य नसल्याची माहिती समोर आली आहे.

विशेषत: त्यांच्या समोरून या वस्तू दूर ठेवायला हव्यात. अमेरिकेतील अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स संस्थेच्या वतीने हे संशोधन करण्यात आले. संशोधनानुसार नवजात शिशूंमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्येचे मूळ कारण बेडिंग असते. तज्ज्ञांनी संशोधन करताना पालकांकडून 20 हजार मुलांच्या अंथरुणाच्या व्यवस्थेविषयीची माहिती घेऊन अभ्यास केला आहे. यामध्ये त्यांना विचारण्यात आले की, तुम्ही कोणता बेड वापरता आणि त्यांच्याजवळ झोपताना काय ठेवता?पालकांनी नवजात शिशूसाठी ज्या प्रकारची अंथरूण व्यवस्था निवडली त्यातून कळले की, चुकून मुलाच्या चेहर्‍यावर पांघरूण टाकण्यात आले, तर त्यांना श्वास घेण्यास अडचण येते.

तसेच मुलाचा श्वासही गुदमरतो. याचा अर्थ मुलांना रजई देऊ नये, असा होत नाही. पालकांनी मुलांसाठी बेडिंगची निवड करताना काळजी घेणे गरजेचे आहे. सडन इन्फंट डेथ सिंड्रोममुळे (एसआयडीएस) अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सने हे संशोधनकार्य हाती घेतले होते. नॅशनल इन्स्टिट्यूट चाईल्ड हेल्थ अँड ह्युमन डेव्हलपमेंटचे एमएसआयडी तज्ज्ञ संशोधक मरिअन वलिंगर यांच्या मते मुलांना कसे झोपवावे, याकडे पालकांनी निट लक्ष द्यायला हवे.कारण शेवटी प्रश्न मुलांच्या आरोग्याचा आहे, एक लहानशी चूकदेखील मुलाच्या जिवावर ओढवू शकते.