घरमुंबईआगरी, कोळी, अदिवासींचा क्लस्टर विरोधात एल्गार !

आगरी, कोळी, अदिवासींचा क्लस्टर विरोधात एल्गार !

Subscribe

ठाण्यात हक्क परिषदेत सरकारला इशारा

ठाणे जिल्ह्यातील सत्ता ही बिल्डर व क्लस्टर धार्जिणी आहे. त्यामुळेच आदिवासी, कोळी आणि आगरी यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत. मात्र, त्याविरोधात आगरी, कोळी, अदिवासी समाज पेटून उठला असून येत्या विधानसभा निवडणुकीत त्याची झलक दिसून येईल. असा इशारा आगरी कोळी समाजाचे नेते, वंचित बहुजन आघाडी राज्य सचिव राजाराम पाटील यांनी गुरुवारी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आयोजित जमीन हक्क परिषदेत दिला.

सरकार विविध योजनांच्या नावाखाली भूमिपुत्रांच्या जमिनी बळकावीत आहेत. त्याविरोधात ठाण्यात जमीन हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, ठाणे जिल्हा आणि शहर पातळीवर क्लस्टर, एसआरए योजनेबाबत आपली घरे दुकाने जातील, अशी जनतेत भीती आहे. तसेच एमआयडीसीच्या जमिनीवर हजारो जनतेची घरे आहेत, तर कोळी आगरी आदिवासी समाजाच्या अनेक पिढ्या गावठाणात राहत आहेत. मात्र, या जमिनी लुटण्यासाठी विविध योजनांच्या नावाखाली जनतेला फसविले जात आहे. मात्र, हा डाव हाणून पाडू, असे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

यावेळी शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ. अरुण सावंत म्हणाले की, शिवसेना भाजपचे धोरण भूमिपुत्रांच्या विरोधात आहे. कोस्टल प्रकल्प हा आगरी कोळी आणि आदिवासी लोकांना उद्ध्वस्त करणारा आहे. तसेच निसर्गाचा नाश करणारा आहे, असेही ते म्हणाले. निर्वासित शीख समुदाय यांनीही आम्ही वंचित आहोत आमचादेखील जमिनीचा प्रश्न आहे. अशी व्यथा मांडत वंचित बहुजन आघाडी सोबत राहणार असल्याची ग्वाही शीख समुदायाचे नेते सुरजितसिंग लभाणा यांनी दिली, तर आगरी समाजाचे नेते चंद्रकांत वैती यांनीदेखील जमीन हक्क मिळवण्यासाठी आगरी समाज वंचित आघाडीसोबत राहणार असल्याचे सांगितले.

ठाण्यातील दलित, आदिवासी, आगरी कोळी बांधवांच्या जमिनींवर बिल्डर लॉबीचा डोळा आहे. त्यातूनच क्लस्टर नावाचे भूत उभे केले आहे. मात्र, हे भूत आम्ही जमिनीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही. असे राजाभाऊ चव्हाण यांनी प्रस्ताविक करताना केले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी सुखदेव उबाळे, जयवंत बैले, श्याम सोनावर, गोविंद पठारे, सुरेश कांबळे, अमर आठवले, राहुल घोडके, राजकुमार मालवी, गोपाळ विश्वकर्मा यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -