घरमुंबईउपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच- अजित पवार

उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच- अजित पवार

Subscribe

ठरल्याप्रमाणे काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून जुंपली आहे. उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आणि विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. आता उपमुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव यांच्यासोबत गुरुवारी शिवाजी पार्कवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र उपमुख्यमंत्री कोण हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

विधानसभेत उद्धव सरकारने बहुमत सिद्ध केल्यानंतर ३ किंवा ४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री कोण हे निश्चित होणार आहे. हे पद राष्ट्रवादीकडे जाणार असल्याचे अगोदर स्पष्ट करण्यात आले होते. मात्र हे पद काँग्रेसला सोडण्यात येईल व राष्ट्रवादीला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल, असे म्हटले जात आहे. अजित पवार यांना याबाबत विचारले असता, उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र विकास आघाडीने पद आणि जबाबदार्‍या आधीच निश्चित केलेल्या आहेत. त्यानुसार विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल.

- Advertisement -

विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल. मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे असेल असे ठरलेले आहे, असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही अजित पवार म्हणाले. वरिष्ठांनी जे ठरवले होते त्यानुसार मुख्यमंत्र्यांसोबत अन्य ६ मंत्र्यांनी कालच शपथ घेतली आहे. आता मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, याबाबत निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे, असेही अजित पवार म्हणाले. मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे अजित पवार यांनी स्वागत केले. आरे कारशेडवर शिवसेनेच्या भूमिकेला सुप्रिया सुळे यांचा आधीपासूनच पाठिंबा होता. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहेच, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -