घरमुंबईअजोय मेहता यांचा आयुक्तपदाचा विक्रम

अजोय मेहता यांचा आयुक्तपदाचा विक्रम

Subscribe

तिनईकरांचा रेकॉर्ड ब्रेक करत पालिका सेवेची चार वर्षे पूर्ण

मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी वर्णी लागणार असल्याच्या वृत्ताने शुक्रवारी महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. महापालिकेतील चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत अजोय मेहता यांच्या बदलीचीच चर्चा सर्वत्र रंगली होती.व्हाट्सअ‍ॅप, ट्विटर आणि फेसबुकवर ‘‘अजोय मेहता मुख्य सचिव तर यूपीएस मदान एमपीएससीचे अध्यक्ष’ या ‘आपलं महानगर’च्या बातमीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मागील चार वर्षांपासून महापालिका आयुक्त म्हणून सेवा बजावणारे मेहता खुद्द पालिकेतील सेवेला कंटाळले असून महापालिकेचे कर्मचारीही त्यांच्या बदलीसाठी, देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यामुळे अजोय मेहता यांच्या बदलीच्या बातमीने महापालिकेचे कर्मचारी सुखावले आहेत. आयुक्तांच्या बदलीची बातमी खरी ठरावी, अशीच चर्चा महापालिकेत ऐकायला मिळत होती.

आजवरच्या मुंबई महापालिका आयुक्तांच्या तुलनेत अजोय मेहता यांनी चार वर्षांची सेवा बजावत महापालिका आयुक्तपदावर सर्वाधिक काळ रहाणारे माजी आयुक्त सदाशिव यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ केला आहे.२७ एप्रिल २०१५ रोजी तत्कालिन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडून महापालिका आयुक्तपदाचा पदभार मेहता यांनी स्वीकारला होता. योगायोगाने त्यांना महापालिकेत ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत तीन वर्षे ९ महिने ८ दिवस मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी बसण्याचा मान माजी महापालिका आयुक्त सदाशिव तिनईकर यांना मिळाला होता. मात्र, २७ एप्रिल २०१९ रोजी अजोय मेहता यांनी मुंबई महापालिकेत ४ वर्षे पूर्ण केल्याने आता हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर झाला आहे. यापूर्वी सदाशिव तिनईकर हे १९८६ ते १९९० च्या दरम्यान महापालिकेत आयुक्त होते. तिनईकर यांची ओळख कडक शिस्तीचे, खमके, वक्तशीर अशी ओळख होती. अजोय मेहता यांचीही ओळख कडक शिस्तीचे, तसेच सर्वांकडून काम करून घेणारे अशी आहे.

- Advertisement -

येत्या चार महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका असून राज्याच्या मुख्य सचिवपदी ‘रिझल्ट ओरियंटेड’ अधिकारी असावा,असा मतप्रवाह मंत्रालयातील सहाव्या मजल्याप्रमाणेच दिल्लीतही सुरु आहे. त्यामुळेच येत्या आठवड्याभरात अजोय मेहता हे राज्याचे मुख्य सचिव म्हणून पदभार सांभाळतील, याला दुजोरा शुक्रवारी देण्यात आला.महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी मुख्य सचिवपदी लागणार असून मुख्य सचिव युपीएस मदान यांची बदली एमपीएससीत होणार असल्याचे वृत्त शुक्रवारी ‘आपलं महानगर’ने दिले होते. महानगरच्या वृत्तानंतर आयुक्तांच्या बदलीची एकच चर्चा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात, विभाग कार्यालय आणि महापालिकेच्या विविध खात्यांच्या कार्यालयात होती. प्रत्येक कार्यालयामध्ये आयुक्तांच्या बदलीचीच चर्चा रंगली होती. आयुक्तांचे दालन, महापौर दालन, अतिरिक्त आयुक्तांच्या कॅबिन्स आणि मुख्यालयातील उपायुक्तांच्या कॅबिन्समध्ये हीच चर्चा होती. आता सर्वजण शनिवारी होणार्‍या आयुक्तांच्या आढावा बैठकीवर नजरा लावून आहेत. कारण जर आता बदली झाली नाहीतर पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेच्या आयुक्तपदी येण्यास कोणी तयार होत नाही. मुंबईतील पावसाळ्याला अजून महिन्याचा अवकाश असल्याने नव्याने येणार्‍या आयुक्तांकडे पुरेसा वेळ असेल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -