घरमुंबईभाड्याने घेतलेल्या कारचा अपहार करून फसवणूक

भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार करून फसवणूक

Subscribe

आरोपीकडून सुमारे 42 लाखांच्या सहा महागड्या कार जप्त

भाड्याने घेतलेल्या कारचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या झहूर अब्दुल गफार शेख या आरोपीकडून ओशिवरा पोलिसांनी सहा महागड्या कार जप्त केल्या असून या कारची किंमत सुमारे 42 लाख रुपये असल्याचे बोलले जाते. झहूर हा अशा गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून आतापर्यंत 48 हून अधिक कारचा अपहार करून फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले असून त्याचा ताबा आता नवसारी पोलिसांकडे सोपविण्यात आला आहे. तक्रारदार शितल तेजस साळुंखे या मालाड येथील लिबर्टी गार्डन, नेव्ही कॉलनीतील जयसागर इमारतीमध्ये राहतात. त्यांचे पती मरिन इंजिनिअर म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहेत. जोडधंदा म्हणून त्यांनी टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हेल्सचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. जून 2016 रोजी त्यांनी सना टुर्स अ‍ॅण्ड टॅव्हेल्स नावाची कंपनी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी टप्याटप्याने तीन कार खरेदी केल्या होत्या.

सुरुवातीला त्यांनी त्यापैकी एक कार एका खाजगी कंपनीला भाड्याने दिली होती. याचदरम्यान त्यांना ओएलएक्सवर द ट्रॅव्हेल्स झोन नावाची एक जाहिरात वाचण्यात आली होती. त्यात कार भाड्याने घेऊन कंपनीला देणे, कारचालक, कारचा मेन्टनन्स आदी सर्व खर्च कंपनी करणार, कारचालकाला दरमहा त्याचे भाडे मिळत राहणार असे नमूद केले होते. त्यानंतर त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईलवर रायन नावाच्या एका व्यक्तीला कॉल केला. या कंपनीचे एक कार्यालय अंधेरीतील हिरापन्ना मॉलमध्ये होते, तसेच कंपनीचा मालक झहुर शेख हा होता. दोन्ही कार भाड्याने देण्याचा व्यवहार केल्यानंतर त्यांचा एक करार झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांना तिन्ही कारसाठी दर महिना ठराविक रक्कम भाडा देण्याचे ठरले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मालकीच्या सुमारे 28 लाख रुपयांच्या तिन्ही कार कंपनीत जमा केले होते. कराराप्रमाणे त्यांना पंधरा दिवसांत पहिला हप्ता आणि 45 दिवसांनंतर उर्वरित हप्ते देण्याचे ठरले होते. मात्र, कंपनीने त्यांना एकही हप्ता दिला नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर झहुर शेख हा वेळकाढूपणा करीत होता.

- Advertisement -

एप्रिल 2019 पर्यंत त्याने एकही हप्ता दिला नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीत फोन करून त्यांना कार परत करण्यास सांगितले. त्यानंतर कंपनीने त्यांच्या बँक खात्यात सतरा हजार जमा केले तर एक लाख सतरा हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश बँकेत न वटता परत आला. त्यानंतर त्यांनी कार्यालयात विचारणा केली असता तिथे अशाच प्रकारे अनेकांच्या कार घेण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, त्यापैकी कोणालाही करारानुसार हप्ते देण्यात आले नव्हते. झहुर शेखकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ओशिवरा पोलिसांत त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवून 19 जुलैला झहुर शेख याला अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -