घरमुंबईएशियन पेन्ट्स कंपनीची फसवणूक, गुन्हा दाखल

एशियन पेन्ट्स कंपनीची फसवणूक, गुन्हा दाखल

Subscribe

बोगस बँक खात्यात पैसे जमा

गोरेगाव येथील एशियन पेन्ट्स कंपनीची सुमारे 28 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात भामट्याविरुद्ध सायबर सेल पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. कंपनीचे हुबेहुब ईमेल आयडी बनवून बोगस बँक खात्यात विदेशी चलन जमा करुन या भामट्याने ही फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा दाखल झाल्याने पळून गेलेल्या आरोपीचा आता सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सागर श्रीकृष्ण खाडे हे गोरेगाव येथील एस. व्ही रोडवरील महिंद्रा गार्डन अपार्टमेंटमध्ये राहत असून एशियन पेन्ट्स कंपनीत मुख्य वित्त अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या कंपनीचे एक कार्यालय गोरेगाव येथील गाईवाडी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये आहे. ही कंपनी गेल्या सात वर्षांपासून इंडस्ट्रियल पेन्ट्स बनवते. त्यासाठी कंपनी वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांकडून कच्चा माल खरेदी करते. दोन वर्षांपूर्वी कंपनीने यंताई युआणली कार्पोरेशन कंपनीला एक ऑर्डर दिली होती. हा संपूर्ण व्यवहार सुरू असताना संबंधित कंपनीला तक्रारदार कंपनीच्या ईमेल आयडीवरुन एक मॅसेज पाठविण्यात आला होता. त्यात बँक खात्यात तपशील देऊन संबंधित बँक खात्यात ऑर्डरची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

- Advertisement -

एप्रिल 2018 ते डिसेंबर 2018 या कालावधीत संबंधित कंपनीने एशियन पेन्ट्स कंपनीकडे 28 लाख रुपये विदेशी चलन जमा केले होते. ही रक्कम जमा झाल्यानंतर कंपनीने त्यांच्याशी पुन्हा बोलणी करुन ऑर्डरबाबत विचारणा केली होती. मात्र त्यांनी सुमारे 28 लाख रुपये बँक खात्यात जमा केल्याचे सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली. यावेळी सागर खाडे यांना त्यांच्या कंपनीचा हुबेहुब ईमेल आयडी बनवून अज्ञात भामट्यांनी दुसर्‍याच ईमेलवरुन विरुद्ध कंपनीला मेल पाठवून त्यात दुसर्‍या बँक खात्यात पैसे जमा करण्याची विनंती केली होती. एशियन पेन्ट्स कंपनीला आर्थिक नुकसान पोहचविण्याच्या उद्देशानेच वेगवेगळ्या बँक खात्याचा तपशील देऊन त्या खात्यात ही रक्कम हस्तांतरण करुन घेतले होते. तसेच फसवणूक करण्यासाठी कंपनीच्या कर्मचार्‍याचा वापर करुन बोगस ईमेल आयडी तयार केला होता. त्यासाठी तक्रारदारांच्या नावाचा गैरवापर केला होता.

सागर खाडे यांनी संबधित कंपनीला कुठलेही मेल पाठविले नव्हते, मात्र त्यांच्या मेलवरुन त्यांना मेल आले होते. अशा प्रकारे अज्ञात भामट्यांनी बोगस ईमेल आयडी बनवून एशियन पेन्ट्स कंपनीची सुमारे 28 लाख रुपयांची फसवणूक केली होती. हा संपूर्ण व्यवहार एप्रिल ते डिसेंबर 2018 या कालावधीत झाला होता. त्यामुळे सोमवारी 14 जानेवारीला सागर खाडे यांनी लेखी अर्जाद्वारे सायबर सेल पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अज्ञात भामट्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या आरोपींच्या अटकेसाठी सायबर सेल पोलिसांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अनेक नामांकित कंपनीची फसवणूक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -