घरमुंबईमंदिराबाहेर भिक मागायची, नावावर होते ४ फ्लॅट; शेवटी सुनेनंच केली हत्या!

मंदिराबाहेर भिक मागायची, नावावर होते ४ फ्लॅट; शेवटी सुनेनंच केली हत्या!

Subscribe

रस्त्यावर भिक मागणाऱ्यांपैकी अनेक जण खरंच गरीब असतात का? असा प्रश्न निर्माण करणाऱ्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहेत. त्यातल्याच एका घटनेचा उलगडा नुकताच मुंबई पोलिसांनी केला आहे. घाटकोपरमधल्या जैन मंदिराबाहेर भिक मागणाऱ्या एका महिलेचा संदिग्ध परिस्थितीत झालेला मृत्यू या सगळ्याला कारणीभूत झाला. तपासानंतर पोलिसांना समजलेलं वास्तव धक्कादायक होतं. संबंधित महिलेच्या नावावर मुंबईत ४ फ्लॅट आहेत. त्यातले २ चेंबुरमध्ये तर २ वरळीमध्ये आहेत. याच फ्लॅटच्या वादातून या महिलेची तिच्याच सुनेनं गळा आवळून हत्या केल्याचं या घटनेच्या तपासातून समोर आलं आहे. संजना असं ७० वर्षीय मृत महिलेचं नाव असून तिच्या सुनेचं नाव अंजना आहे.

..म्हणे ती घसरून पडली!

सोमवारी संजना यांना मृत अवस्थेत तिचा दत्तक घेतलेला मुलगा आणि त्याची पत्नी अंजना राजावाडी रुग्णालयात घेऊन आले. संजनाचा पाय घसरून ती पडल्याचं तिच्या मुलानं आणि सुनेनं सांगितलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संजना यांच्या गळ्यावर वळ दिसून आले. तसेच, त्यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर हळूहळू सत्य परिस्थिती समोर यायला लागली.

- Advertisement -

नक्की घडलं काय?

संजना आणि त्यांची सून अंजना यांच्यात सातत्याने वाद होत असत. अंजनाला संजना यांच्या नावावर असलेले फ्लॅट तिच्या नावावर करून हवे होते. या चारपैकी तीन फ्लॅट त्यांनी भाड्याने दिले असून एका फ्लॅटमध्ये ते स्वत: राहात आहेत. संजना यांनी नकार दिल्यानंतर वारंवार त्यांच्यात वादावादी व्हायला लागली. सोमवारी त्या दोघींमध्ये वादावादी झाली. अंजनाला राग अनावर झाला आणि तिने संजना यांना क्रिकेट बॅटने मारायला सुरुवात केली. त्यातही समाधान न झाल्यामुळे अंजनानं कपड्यांच्या नाडीने संजना यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. नाडीही तुटल्यानंतर अंजनानं थेट मोबाईल चार्जर घेतला आणि गळा आवळायला सुरुवात केली. अखेर संजना यांचा मृत्यू झाल्यानंतर तिचा राग शांत झाला. हत्या लपवण्यासाठी मग तिने आणि तिच्या पतीने संजना घसरून पडल्याचं नाटक करत त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

भिक मागायची संजना!

दरम्यान, पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर या घटनेची अजून एक बाजू त्यांना समजली. संजना घाटकोपरमधल्या जैन मंदिराच्या बाहेर बसून भिक मागत होती. त्यातूनच ४ फ्लॅटची संपत्ती जमा झाली होती. याच संपत्तीच्या वादातून अखेर तिची हत्या झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -