घरमुंबईभाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

भाजप आमदारांच्या निलंबनाचे भास्कर जाधवांना बक्षीस?

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदी सत्ताधार्‍यांची सर्वाधिक पसंती

विधानसभेत गोंधळ घालणार्‍या भाजप आमदारांना वठणीवर आणणारे शिवसेनेचे आमदार आणि पावसाळी अधिवेशनातील तालिका सदस्य भास्कर जाधव यांना अध्यक्षपदाचे बक्षीस मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले होते. जाधव यांच्या या कृतीने भाजप चांगलाच बॅकफुटवर आला. इतकेच काय या आमदारांच्या एकूणच वर्तनाने राज्यात एकच चर्चा झडली. पीठासनावरून धडाकेबाज निर्णय घेतल्याचे बक्षीस म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, काँग्रेसची याला तयारी नसल्याचे सांगितले जाते. मात्र, जाधव यांच्या पीठासनावरील कामकाजाचे काँग्रेस पक्षानेही कौतुक केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपकडून सरकारला चित करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवण्यात आल्या होत्या. दोन दिवसांच्या कालमर्यादेला विरोध करताना सरकारविरोधी हवा त्या पक्षाने सुरुवातीपासूनच निर्माण केली होती. तरीही दोन दिवसात अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई आणि परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांच्या तसेच शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांच्या दापोली येथील बंगल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला होता. याशिवाय मराठा आणि ओबीसी आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असल्याच्या आक्षेपालाही अधिवेशनात धार देण्याची आखणी त्या पक्षाने केली होती. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच भाजपच्या सदस्यांनी महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू करत विधान भवनाच्या पायर्‍यांवर बसकण घेतली होती.

- Advertisement -

आरक्षणाच्या मुद्यावर विधानमंडळात आणण्यात आलेल्या ठरावावेळी भाजप आमदारांनी घातलेल्या गोंधळात पीठासीन अधिकारी असलेले भास्कर जाधव यांना अश्लील शिवीगाळ करण्यात आली. सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आल्यावर भाजप आमदारांनी अध्यक्षांच्या दालनात जाऊन जाधव यांना धक्काबुक्की आणि शिव्या दिल्या. या घटनेची दखल घेत जाधव यांनी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर करत भाजपच्या शिडातील हवाच काढून घेतली. एकाचवेळी १२ आमदारांविरोधी कारवाई झाल्याने भाजप नेते चांगलेच अडचणीत आले.

पीठासीन अधिकारी म्हणून जाधव यांनी घेतलेल्या कठोर निर्णयाचा फटका भाजपला बसू शकतो, हे सत्ताधारी महाविकास अघाडीला कळून चुकले. यातून मग भास्कर जाधव यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची चर्चा सुरू झाली. यासाठी आपल्याकडील वनमंत्रीपद काँग्रेसला देत अध्यक्षपदी जाधव यांची वर्णी लावण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस अणि शिवसेनेने यासाठी तयारी सुरू केली आहे.

- Advertisement -

दोन दिवसांच्या अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी चांगले काम केले. त्यांचे कौतूकच आहे. पण म्हणून हे पद शिवसेनेला देण्यासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही. उलट आमच्याकडेही भास्कर जाधव यांच्यासारखे आमदार आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -