घरमुंबईचहल कामाला लागले, परदेशी सुट्टीवर गेले

चहल कामाला लागले, परदेशी सुट्टीवर गेले

Subscribe

मुंबई महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेताच इक्बालसिंह चहल थेट कोविड-१९ च्या युद्धात उतरले. पदभार स्वीकारताच त्यांनी अंगात सुरक्षा पोशाख अर्थात पीपीई किट अंगात चढवत नायर रुग्णालयातील कोविडच्या कक्षात प्रत्यक्ष भेट देत तेथील रुग्णांवरील उपचार तसेच रुग्णालयातील व्यवस्था व साधनसामग्रीचा आढावा घेतला. त्यानंतर करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढणार्‍या धारावीत जावूनही आढावा घेतला. मात्र, चहल यांनी पदभार स्वीकारताच कामाला सुरुवात केली असली तरी महापालिका आयुक्तपदावरून गच्छंती करण्यात आलेले प्रविणसिंह परदेशी हे नगरविकास खात्याच्या अपर सचिवपदाची सूत्र घेताच रजेचा अर्ज टाकत सुट्टीवर गेले आहेत.

नवनियुक्त महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी शुक्रवारी उशिरा पदभार स्वीकारल्यानंतर सर्व अतिरिक्त आयुक्तांसोबत त्यांनी करोनासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर शनिवारी सकाळी महापालिकेच्या नायर रुग्णालयात भेट देवून कोविड-१९ च्या उपचार सेवा सुविधांबाबत आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, डॉ. गौतम भंसाली व इतर उपस्थित होते. यावेळी यांनी रुग्णालयांच्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांशी मनमोकळी चर्चा केली. विविध बाबींवर शंका-निरसन करून घेतल्यानंतर त्यांनी प्रशासन निर्देश देत ते रुग्णालय प्रशासनाने अमलात आणावेत. करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र, अथक प्रयत्न करत असलेल्या वैद्यकीय मंडळींना व्यक्तीश: धन्यवाद दिले. आरोग्य यंत्रणेला माझा सर्वतोपरी पाठिंबा आहे. परंतु उपचार, आरोग्य सेवा यामध्ये कोणत्याही त्रुटी राहता कामा नयेत, अडचणी असल्यास प्रशासनाशी संपर्क करू शकता, असे आयुक्तांनी सांगितले.

- Advertisement -

आणि त्यांनी अंगात पीपीई किट चढवला
आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांनी स्वसंरक्षण पोशाख अर्थात पीपीई किट परिधान करत थेट करोना बाधितांवर उपचार सुरू असलेल्या कक्षाची पाहणी केली. अतिदक्षता कक्षात प्रत्यक्ष करोना बाधितांपर्यंत जाऊन वैयक्तिकरित्या विचारपूस केली. रुग्णालयाकडून मिळणारे उपचार, प्रकृतीत झालेली सुधारणा, औषधे व अन्नपुरवठा या संदर्भात रुग्णांकडून वस्तुस्थिती जाणून घेतली. करोनासह इतरही आजार असलेल्या रुग्णांना धीर देत आयुक्तांनी कुठल्या प्रकारच्या सुधारणांची आवश्यकता आहे हेही जाणून घेतले. तसेच रुग्णालयातील परिचारिका, निम वैद्यकीय कर्मचारी वर्ग आदींच्या सुविधा तसेच अडचणी जाणून घेतल्या.

धारावीतील बाधित क्षेत्रात जाऊन रहिवाशांशी संवाद                                                                        चहल यांनी यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम हाताळल्याने त्यांना या विभागाची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे नायर रुग्णालयातून त्यांनी धारावीतील मुकुंद नगर व शास्त्री नगर परिसराला भेट दिली. यावेळी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी विभागातील करोनाच्या रुग्णांसह केल्या जाणार्‍या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर आयुक्तांनी, दाट वस्तीतील बाधित क्षेत्राजवळ जावून प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर सार्वजनिक शौचालयांचीही पाहणी करून त्यांनी या शौचालयांची नियमित सफाई व निर्जंतुकीकरण योग्यरित्या झाले पाहिजे, असे निर्देश संस्थांना दिले. तसेच येथील इमारती व झोपडपट्टीतील बाधित क्षेत्रात जेवण, रेशन, भाजीपाला, औषधे आदींचा पुरवठा कशाप्रकारे होतो याची माहिती रहिवाशांकडून घेतला. तसेच खासगी दवाखान्यांचे डॉक्टर व तसेच महापालिका आरोग्य केंद्राच्या कर्मचार्‍यांशीही संवाद साधून कोरोनाबाधितांच्या निकटच्या संपर्कात येणार्‍या अधिकाधिक व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण कक्षात आणले जावे, असे निर्देश दिले. या विभागात इमारती आणि झोपडपट्टी तथा दाट वस्तीत आढळून येणार्‍या करोना रुग्णांचे वर्गीकरण करावे. इमारतींमध्ये शक्य असल्यास अलगीकरण करावे अन्यथा संस्थात्मक अलगीकरण केंद्रात पाठवून जास्तीत जास्त व्यक्तींना तिथे नेण्यात यावे, असेही निर्देश चहल यांनी दिले.

- Advertisement -

परदेशी गेले रजेवर                                                                                                          गेल्या दीड महिन्यापासून मुंबईत करोनाचा फैलाव सातत्याने वाढतच असून त्यावर निश्चित उपाय योजण्यात मुंबईचे माजी आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांना अपयश येत होते. या पार्श्वभूमीवर प्रविणसिंह परदेशी यांची शुक्रवारी तातडीने नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव या पदावर केली. तर त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी इक्बाल चहल यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली. यामुळे प्रविणसिंह परदेशी नाराज झाले असल्याच्या चर्चा सुरू असतानाच ते नगरविकास विभागाच्या अपर सचिव पदाचा पदभार स्वीकारताच तडकाफडकी रजेवर गेले आहेत. सोमवारी त्यांच्या रजेच्या अर्जावर निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.

आयुक्तपदावरून हटवल्याने परदेशी नाराज झाले असून त्यामुळे ते रजेवर गेल्याचे बोलले जात आहे. परंतु एक महिन्यापासून करोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आजवर कधीही रस्त्यावर न उतरलेले परदेशी हे मुख्यालयात बसून व्हिडिओ कॉन्फरन्सीद्वारे किंवा झुम कॉलद्वारे उपायुक्त, सहायक आयुक्त तसेच सर्वांशी संवाद साधायचे. पण चहल यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेताच अंगावर पीपीई किट चढवत रुग्णालयात धाव घेत कामाला सुरुवात केली. परंतु परदेशी यांनी पदभार न स्वीकारताच रजा टाकल्याने सर्वत्र टिकेचा विषय ठरला आहे.

शनिवार, रविवार सुट्टी असल्याने सोमवारी परदेशी यांच्या अर्जावर निर्णय घेऊन अन्य अधिकार्‍यांकडे अतिरिक्त जबाबदारी सोपविणार असल्याचे समजते. परदेशी यांची पत्नी विदेशातून मायदेशी परतणार आहेत. त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार असल्याने पत्नीच्या मदतीसाठी परदेशी हे रजेवर गेल्याची चर्चा आहे.

वडिलांच्या सेवेसाठी रजेचा अर्ज- परदेशी                                                                                    मी नगरविकास खात्याचा पदभार स्वीकारला असून रजेचाही अर्ज दिला आहे. करोना प्रतिबंध उपाययोजना करण्यासाठी गेले दोन महिने मी दिवस रात्र काम करत होतो. यादरम्यान मला आजारी असलेल्या माझ्या वडिलांना वेळ देता आलेला नाही. त्यांना आता वेळ देता यावा यासाठी आठवड्याभराच्या रजेचा अर्ज केला आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण परदेशी यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -