घरमुंबईबोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

बोगस कॉल सेंटरचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Subscribe

कॉल सेंटरच्या मालकासह मॅनेजर गजाआड

बोगस कॉल सेंटरद्वारे प्रतिबंधित औषधांची विक्री करुन अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुद्दसर हारुण मकानदार आणि अ‍ॅशले ग्लेन डिसोझा अशी या दोघांची नावे असून ते दोघेही अंधेरी आणि साकिनाकाचे रहिवाशी आहे. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरी परिसरात बोगस कॉल सेंटर उघडून काहीजण अमेरिकन नागरिकांना संपर्क साधून त्यांच्याकडून भारतात प्रतिबंधित असलेल्या व्हायग्रा, सिआलीस, लिव्हेट्रा या औषधांची खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणूक करीत आहे अशी माहिती युनिट दहाच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली या पोलीस पथकाने अंधेरीतील मरोळ-मरोशी रोड, सुमेर प्लाझाच्या तिसर्‍या मजल्यावरील ए. एम. एम कॉल कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता.

- Advertisement -

यावेळी तिथे पोलिसांना 22 कर्मचारी हेडफोन माईकवरुन व्हिओआयपी गो ऑटोडायल अ‍ॅण्ड जॉयफरद्वारे अमेरिकन नागरिकाीं संपर्क साधून तेच अमेरिकन नागरिकच बोलत असल्याची बतावणी करीत होते. या नागरिकांना भारतात प्रतिबंधित असलेल्या औषधांची विक्री करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाईन डॉलरच्या माध्यमातून पेमेंट घेतले जात होते. अशा प्रकारे ही टोळी अमेरिकन नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. हा प्रकार उघडकीस येताच तेथून पोलिसांनी राऊटर, सर्व्हर कनेक्टर, संगणक, माईक, मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी कॉल सेंटरचा मालक मुद्दसर मकानदार आणि मॅनेजर अ‍ॅशले डिसोझा या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी हा कॉल सेंटर सुरु करुन अमेरिकन नागरिकांची फसवणुक करण्यास सुरुवात केली होती. भारतात प्रतिबंधित औषधांसह ट्रामाडोल, प्रोपेसिया, सिन्थरॉईड, सोमा, अमॉक्सीलिन या औषधांचीही ही टोळी ऑनलाईन विक्री करीत असल्याचे भासवून अमेरिकन नागरिकांकडून पैसे उकाळत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीत इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -