घरमहाराष्ट्रप्रदूषण मंडळाचे अधिकारी धाटावकडे धावले !

प्रदूषण मंडळाचे अधिकारी धाटावकडे धावले !

Subscribe

आपलं महानगर’ इम्पॅक्ट

तालुक्यातील धाटाव परिसरातील गंगा नदीमधील वाढत्या प्रदूषणाचे वृत्त ‘आपलं महानगर’मध्ये (18 जानेवारी) प्रसिद्ध होताच याची महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने गंभीर दखल घेऊन अधिकार्‍यांनी धाटावकडे धाव घेतली. ही नदी प्रदूषित करणार्‍या कारखान्यांना शोधून काढण्यासाठी विविध ठिकाणांहून रसायनयुक्त पाणी तपासणीसाठी घेण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून धाटाव औद्योगिक क्षेत्रातील काही कारखान्यांनी महादेव वाडीकडून येणारी आणि पुढे कुंडलिका नदीला मिळणार्‍या गंगा नदीमध्ये रसायनिमिश्रित सांडपाणी प्रक्रियेविना सोडण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला आहे. याबाबत अनेकदा ओरड होऊनही थातूरमातूर कारवाई पलीकडे काहीच घडत नाही. ‘आपलं महानगर’च्या वृत्तात थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे लक्ष वेधल्यानंतर खडबडून जागे (!) झालेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी सोमवारी धाटावमध्ये धाव घेतली. मंडळाचे क्षेत्र अधिकारी उत्तम माने यांनी तातडीने नदीतील दूषित पाण्याचे नमुने घेतले आहेत.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे गंगा नदीच्या उगम स्थानापासून कोणकोणत्या नाल्यांतून कारखाने दूषित पाणी सोडतात ते नाले ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून क्षेत्र अधिकार्‍यांना दाखवले. यात अन्थिया केमिकल, मझदा कलर्स लिमिटेड, डीएमसी, एक्सेल, रोहा डायकेम या कारखान्यांतून घातक सांडपाणी नाल्याद्वारे नदीत सोडले जात असल्याचे निदर्शनास आले. पाण्याचे नमुने तपासून दोषींवर कारवाई निश्चित केली जाईल, असे माने यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, रोठ खुर्दचे माजी सरपंच लीलाधर मोरे, कुंडलिका बचाव समिती अध्यक्ष रमेश जोशी, पोलीस पाटील जगू मोरे, राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोरे आदींसह ग्रामस्थ आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गंगा नदीत सोडल्या जाणार्‍या दूषित पाण्यामुळे परंपरागत मासेमारी आणि या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेला भाजीपाला व्यवसाय धोक्यात आला आहे.
-लीलाधर मोरे, माजी सरपंच, रोठ खुर्द

- Advertisement -

गंगा नदीमध्ये जे कारखाने नाल्याद्वारे दूषित पाणी सोडत आहेत तेथील पाण्याचे नमुने घेतले आहेत. दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
-उत्तम माने, क्षेत्र अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

प्रत्येक वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी येतात आणी पाण्याचे नमुने घेऊन जातात. मात्र वर्षभर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावेळी असे केल्यास तेच पाणी आम्ही आधिकार्‍यांना प्यायला भाग पाडू.
-अमित घाग, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, रायगड जिल्हा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -