घरमुंबईसफाळ्यात शेअर रिक्षा चालकांची मुजोरी

सफाळ्यात शेअर रिक्षा चालकांची मुजोरी

Subscribe

सफाळे रेल्वे फाटक हद्दीतील शेअर रिक्षा चालकांच्या मुजोरीमुळे प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहतुकीच्या नियमांना धाब्यावर बसवत रिक्षा चालकाच्या दोन्ही बाजूला तसेच पाठीमागे असे 7 ते 8 प्रवासी कोंबून धोकादायक परिस्थितीत रिक्षा चालवत असून काल अतिरिक्त प्रवासी भरलेली रिक्षा पेट्रोल पम्पनजीक कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने कलंडली जाऊन मोठा अपघात झाला. या अपघातात रिक्षा चालकासह काही प्रवासी गभीर जखमी झाले आहेत. यासर्व प्रकारावर स्थानिक पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याने रिक्षा चालकांची मुजोरी वाढली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

दिवाळी सण आणि आठवडा बाजार असल्याने परिसरातील विविध गावापाड्यातील नागरिकांनी येथील बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. अशातच कर्दळपाडा, कपासे, डोंगरपाडा, ठाकूरपाडा आदी भागातील गोरगरीब नागरिकांनीही बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. या नागरिकांना बाजारपेठेत येण्याजाण्यासाठी रेल्वे फाटकाजवळील पूर्वेकडील शेअर रिक्षाचा आसरा घ्यावा लागतो. नथुनी नामक रिक्षा चालक नेहमीप्रमाणे अतिरिक्त प्रवासी भरून ठाकुरपाडा दिशेने जात होता. सदर रिक्षा पेट्रोल पम्पनजीक आल्याने अचानक कुत्रे आडवे आले. मात्र रिक्षा अतिरिक्त प्रवाशांनी भरली असल्याने चालक नथुनी याचे नियंत्रण सुटून रिक्षा कलंडली. या अपघात चालक नथुनी याच्यासह प्रवासी सोमारी भोईर, वसंत कोम आदी जखमी झाले. जखमींना तात्काळ सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तर वसंत कोम गंभीर जखमी असल्याने त्याला पालघर येथील अन्य हॉस्पिटलात हलवण्यात आले.

- Advertisement -

येथील रिक्षा चालक वाहतुकीच्या नियमांना केराची टोपली दाखवत बिनदिक्कत 7 ते 8 प्रवासी कोंबून दररोज वाहतूक करतात. प्रवाशांनी खचाखच रिक्षा भरेपर्यंत इतर प्रवाशांना ताटकळत तासनतास बसावे लागते. एखाद्या प्रवाशांने नियमांची जाणीव करून देताच चालक त्यांच्याशी असभ्यतेने वागत असल्याचे नागरिकांमधून सांगण्यात येते. रिक्षा चालकांच्या मनमानी कारभाराला सफाळे पोलिसांनी वेळीच वेसण घालून कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

सफाळे रेल्वे फटकाजवळील रिक्षा चालक अतिरिक्त प्रवासी भरून धोकादायकपणे वाहतुक करत आहेत. प्रवाशांशी असभ्य वागणे, उलट उत्तरे देणे असे मनमानी कारभार असून नागरिकांच्या जीवावर बेतत असून त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
– वसंत भोईर, ग्रामस्थ माकुणसार

- Advertisement -

अतिरिक्त प्रवासी भरून वाहतुकीच्या नियमांचा भंग करणार्‍या मुजोर रिक्षा चालकांवर लवकरच कारवाई केली जाईल.
-पोलीस अधिकारी, संदीप सानप, सफाळे पोलीस स्टेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -