घरक्रीडाभावा, या मालिकेत काही करू शकतोस का?

भावा, या मालिकेत काही करू शकतोस का?

Subscribe

शाकिबचा बुकीसोबतचा व्हॉट्सअ‍ॅप संवाद उघड

बांगलादेशचा प्रमुख अष्टपैलू शाकिब अल हसनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) मंगळवारी दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने त्याच्याशी संवाद साधला होता. परंतु, याबाबतची माहिती शाकिबने आयसीसीला दिली नाही. त्यामुळेच आयसीसीने त्याच्यावर ही कारवाई केली. बुधवारी त्याच्यातील आणि दीपक अगरवाल नामक बुकीमधील व्हॉट्सअ‍ॅप संवाद आयसीसीने उघड केला. आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, दीपक अगरवाल या बुकीने २०१७ साली पहिल्यांदा शाकिबशी संवाद साधला होता. त्यानंतर तो सतत शाकिबच्या संपर्कात होता.

नोव्हेंबर २०१७ मध्ये शाकिब बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत ढाका डायनामाईट्स संघाकडून खेळत होता. त्यावेळी दीपक अगरवालला एका व्यक्तीने शाकिबचा मोबाईल नंबर दिला होता. दीपक अगरवालने त्या व्यक्तीकडे बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळत असणार्‍या खेळाडूंचे नंबर मागितले होते. त्यानंतर २०१८ साली बांगलादेश, झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात तिरंगी मालिका झाली होती. या मालिकेतील सामन्यात शाकिबला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल १९ जानेवारी २०१८ ला दीपक अगरवालने शाकिबचे मेसेज करत अभिनंदन केले.

- Advertisement -

त्यानंतर बुकी दीपक अगरवालने शाकिबला आणखी एक मेसेज केला आणि म्हटले, तू या मालिकेत काही काम करणार आहेस की मी आयपीएल स्पर्धेपर्यंत वाट पाहू. या मेसेजमध्ये काम हा शब्द वापरण्यात आला, ज्याचा अर्थ होता की अंतर्गत माहिती दीपक अगरवालला देणे. पुढे २३ जानेवारी २०१८ रोजी दीपक अगरवालने शाकिबला पुन्हा मेसेज केला आणि विचारले, भावा, या मालिकेत काही करू शकतोस का? हा मेसेज मला आला होता, अशी कबुली शाकिबने दिली आहे. तसेच या मेसेजचा अर्थ तिरंगी मालिकेबाबतची माहिती पुरवणे असा होता, असेही शाकिबने सांगितले. मात्र, शाकिबने याबाबतची माहिती आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समिती किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेला दिली नाही.

शाकिब आणि बुकी दीपक अगरवाल यानंतरही संपर्कात होते. २०१८ आयपीएलदरम्यानही दीपक अगरवालने शाकिबला मेसेज पाठवला होता. तसेच अगरवालने शाकिबला बिटकॉईन्स, डॉलर खाती आणि बँक खात्याविषयीही विचारणा केली होती. मात्र, मला आधी तुला भेटावे लागेल, असे शाकिब बुकी दीपक अगरवालला म्हणाला. तसेच शाकिबने आयएसीसीच्या समितीला सांगितले की, मी अगरवालला कोणतीही माहिती दिली नाही. त्याच्याकडून कोणतीही ऑफर स्वीकारली नाही आणि पैसेही घेतले नाहीत.

- Advertisement -

शाकिब संघात नसल्याने आम्ही खचणार नाही -मोहमदुल्लाह

शाकिब अल हसनवर आयसीसीने बंदी घातल्यानंतर मोहमदुल्लाहची बांगलादेश टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाली. शाकिब संघात नसला, तरीही बांगलादेश संघ चांगली कामगिरी करेल असा मोहमदुल्लाहला विश्वास आहे. शाकिब संघात नसल्याने आम्ही खचणार नाही, तर अधिक जिद्दीने खेळू. देशासाठी खेळण्यापेक्षा मोठा सन्मान नाही. या संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. आमचा संघ सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल हे नक्की, असे मोहमदुल्लाह म्हणाला. बांगलादेशचा संघ लवकरच भारताच्या दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यात जिंकणे आव्हानात्मक असेल, असे मोहमदुल्लाहला वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -