घरमुंबईओसी नसताना मुख्यमंत्र्यांकडून चावी वाटप

ओसी नसताना मुख्यमंत्र्यांकडून चावी वाटप

Subscribe

मुंबई काँग्रेसचा आरोप, मुख्य सचिवांकडे धाव

गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई एअर पोर्ट नजीकच्या झोपडपट्टीवासियांचा प्रश्न सोडवित भाजपतर्फे सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली येथील रहिवाशांना चावी वाटप करण्यात आले. भाजपाच्या या घोषणेला चोवीस तास उलटत नाहीत, तोच मुंबई काँग्रेसने या चावी वाटपावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या घरांचे चावी वाटप केले आहे, त्या घरांना अद्याप ओसी मिळालेली नसल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तर या ठिकाणी कोणत्याही सोयीसुविधा नसताना मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाचे चावी वाटप केले कसे, असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. तर आगामी निवडणूक लक्षात घेऊनच मुंबई भाजपने हा कार्यक्रम उरकून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केलाआहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेेचे आयोजन केले होते. या परिषदेत त्यांनी भाजपवर आरोप केले असून यावेळी चांदिवली विधानसभेचे स्थानिक आमदार नसीम खान उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमावर आक्षेप नोंदवित याप्रकरणी मुख्य सचिवांपर्यंत धाव घेतल्याची माहिती दिली. या इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाची मध्यवर्ती संस्था म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती करण्यात आलेली असताना त्यांनादेखील अंधारात ठेवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. आचारसंहिता जवळ आल्यानेच ही लगीनघाई केल्याचा आरोप यावेळी नसीम खान यांनी केला.

- Advertisement -

एअर पोर्टच्या जागेवर वसलेल्या क्रांती नगर, संदेश नगर, संपूर्ण जरीमरी येथील अंदाजे १२००० परिवारांचे पुनर्वसन गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होते. हा प्रश्न मार्गी लावत असल्याची घोषणा करताना सोमवारी भाजपतर्फे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते येथील नागरिकांना चावी वाटप करण्यात आले. या घोषणेला मुंबई काँग्रेसकडून लक्ष्य करण्यात आले असून या इमारतींचे बांधकाम २०१२ – १३ रोजी पूर्ण करण्यात आले होते. मात्र पात्रताधारक निश्चित करण्यात आले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. याबद्दल बोलताना आमदार नसीम खान म्हणाले की, अत्यंत जाणीवपूर्वक या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्थानिकांनाच प्रवेश देण्यात आलेला नव्हता. हजारो प्रकल्पग्रस्त असताना काही मोजक्याच जणांना फक्त कागदी चाव्या का देण्यात आल्या. काही दिवसांत आंचारसंहिता लागू होणार असल्याने हा कार्यक्रम आयोजित करण्याची घाई करण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या अंतर्गत हा प्रकल्प असताना त्यांनादेखील त्याची कल्पना का देण्यात आलेली नाही? याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले. गेल्या आठ वर्षांपासून या इमारती तशाच असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. या इमारतींना आवश्यक त्या सोयीसुविधा नाहीत. या इमारतींना ओसीदेखील नाही. त्यामुळे या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, यावेळी बोलताना मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले की, राहुल गांधी यांनी मुंबईत झालेल्या सभेत ५०० चौ.फू.घरांची घोषणा केली होती. या घोषणेवर आम्ही ठाम असून यासाठी कोणत्याही डीपीत बदल करण्याची गरज नसल्याचे निरुपम यांनी यावेळी स्पष्ट केले. मुंबईत एसआरएचे सुमारे २००० प्रकल्प आहेत त्यामधील ७० टक्के बंद पडलेले आहेत. या घोषणेमुळे बिल्डरांमध्येही उत्साह निर्माण झालेला आहे. त्या प्रकल्पांना पुन्हा चालना मिळेल. सर्व गरिबांना ५०० चौरस फूट मोफत घरे सहज शक्य आहेत, त्यासाठी कोणताही डीसी नियम बदलावा लागणार नाही, कोणताही नवीन कायदा आणावा लागणार नाही, कोणतेही मोठे नियम बदलावे किंवा आणावे लागणार नाहीत. याबाबत आमची काँग्रेसची टीम कामाला लागलेली आहे. महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी खासदार मिलिंद देवरा आणि या विषयातील काही तज्ञ मंडळी यांनी काम सुरु केलेले आहे. आम्ही लवकरच याबाबतचा सखोल रिपोर्ट सादर करू. भविष्यामध्ये झोपडपट्टीतील लोकांना काँग्रेस चांगले जीवन जगायला देणार आहे, अशी माहिती निरुपम यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

कपूर यांच्याविरोधात मुख्य सचिवांकडे धाव

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या चावी वाटपाचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आला होता. हा सरकारी कार्यक्रम नव्हता. पण या कार्यक्रमात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यक्रारी अधिकारी दीपक कपूर यांनी हजेरी लावल्याने विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमाला सनदी अधिकारी कसे उपस्थितीत राहतात. इतकेच नव्हे तर या कार्यक्रमात त्यांनी भाषणदेखील केले. हे सनदी अधिकारी कायद्याच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार नसीम खान यांनी यावेळी केला. त्याविरोधात त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार केली असल्याची माहिती यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

सिडको घोटाळ्याच्या चौकशीबाबत चालढकल

गेल्यावर्षी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी सिडकोच्या कोयना प्रकल्पग्रस्त लोकांसाठीच्या जमिनीच्या घोटाळ्याचे प्रकरण समोर आणले होते. त्याप्रकरणी निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र याप्रकरणी चौकशी करण्यास चालढकल केली असल्याचा आरोप निरुपम यांनी मंगळवारी केला. आता ८ महिने झाले तरी कोणतीही चौकशी होत नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीश आर.सी.चव्हाण यांची समिती नेमली आहे. पण आमच्या माहितीनुसार चव्हाण यांनी अजून या घोटाळ्याच्या चौकशीचे काम सुरू केलेले नाही. त्यांना पुन्हा ३ महिने मुदत वाढ दिलेली आहे. मुख्यमंत्री जाणूनबुजून नवी मुंबई जमीन घोटाळ्याची चौकशी टाळत आहेत आणि मुद्दामून विलंब लावत असल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.

नाव बदलायची तयारी ठेवा

सोमवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात पूनम महाजन यांनी राहुल गांधीवर टीका केली. ‘राहुल गांधींनी आधी स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर आणि स्क्वेअर इंच यामधला फरक सांगावा. राहुल गांधींनी मुंबईकरांना सभेदरम्यान ५०० स्क्वेअर फूटांची घरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावरुन पूनम महाजन यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ‘राहुल गांधींनी स्क्वेअर मीटर आणि फूटांमधील फरक सांगितला तर, मी नाव बदलून दुसरं काम करेन’, असेही पूनम महाजन म्हणाल्या होत्या. राहुल गांधींवर केलेल्या या टीकेला उत्तर देताना संजय निरुपम म्हणालेे की, खरंच पूनम महाजन यांच्यावर नाव बदलायची वेळ येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -