घरमुंबईनागरिकांना मेट्रो 3 प्रकल्पाचे काम पाहता येणार

नागरिकांना मेट्रो 3 प्रकल्पाचे काम पाहता येणार

Subscribe

मुंबईतल्या अतिशय दाटीवाटीच्या आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या कुलाबा वांद्रे सीप्झ या मुंबई मेट्रो 3 मार्गावरचे सुरू असलेले काम पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. देशातल्या सर्वात मोठ्या भूमिगत मेट्रो 3 प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणचे सध्या सुरू असलेले काम पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यांमध्ये काही ठरावीक स्थानकांच्या ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचे काम पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

मुंबईत सुरू असणार्‍या मेट्रो 3 प्रकल्पाच्या निमित्ताने कुलाबा वांद्रे सिप्झ दरम्यानचे 33.5 किलोमीटर लांबीचे भुयारीकरणाचे काम, 8000 कामगार, 360 फूट खोल भूमिगत काम करणार्‍या मशिन्स, 27 स्थानके असे वैशिष्ठ्य असलेला हा प्रकल्प आहे. सर्वात सुरक्षित आणि महत्त्वपूर्ण टप्प्यात अशा ठिकाणी फिल्ड व्हिजिटच्या माध्यमातून प्रत्यक्ष भुयारीकरण अंतर्गत सुरू असलेले मेट्रो 3 प्रकल्पाचे काम पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. संपूर्ण भुयारीकरणाच्या कामादरम्यान आलेली आव्हाने तसेच ही प्रक्रिया समजावून सांगणे हाच नागरिकांच्या भेटीदरम्यानचा उद्देश असेल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली.

- Advertisement -

आतापर्यंत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी तसेच या क्षेत्रात संशोधन करणारे आणि तज्ज्ञ अशा व्यक्तींनाच मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी अभ्यास भेटी देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पण, दोन महिन्यांमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांनाही हे प्रकल्प पाहण्याची संधी मिळणार आहे. ज्याठिकाणचे काम हे नागरिकांना पाहण्यासाठी सुरक्षित आहे अशाच मेट्रो साईटची व्हिजिट ही काम पाहण्यासाठी करण्यात येणार आहे. त्याठिकाणी आतापर्यंत झालेल्या कामाचा तसेच सध्या सुरू असलेल्या कामाचा डेमो सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पण, कोणत्या ठिकाणच्या स्थानकांवर नागरिकांना प्रकल्प पाहण्याची संधी असेल याबाबत लवकरच निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांनी गेल्या वर्षभरातही मेट्रोच्या कामाला उत्तम साथ दिली आहे. गेल्या वर्षभरात शहरात अनेक ठिकाणी पायलिंगच्या कामापासून ते रस्ते वाहतूक वळवण्यापर्यंतच्या कामाचा समावेश होता. भूमिगत प्रकल्पाच्या कामामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर हादरे आणि आवाजाचे काम सुरू असतानाही मुंबईकरांनी या सगळ्या कामात आम्हाला चांगले सहकार्य केले आहे. मुंबईसारख्या जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या शहरातही मुंबईकरांनी हे काम भविष्यातला वाहतुकीचा पर्याय म्हणून स्वीकारलेले आहे. त्यामुळेच आगामी वर्षभरातही असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन अश्विनी भिडे यांनी मुंबईकरांना केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -