घरमुंबईरेल्वेच्या ६पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

रेल्वेच्या ६पोलीस कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

Subscribe

लोकल ट्रेनच्या माल डब्यात प्रवास करणार्‍या एका कॉलेज तरुणांकडून पैसे घेऊन पोलीस ठाण्यातील सरकारी दस्तऐवजामध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई रेल्वे पोलीस दलात उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्टेशन डायरीत फेरफार करणार्‍या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह ६ पोलीस कर्मचार्‍यांविरुद्ध वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व पोलीस शिपाई वडाळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व पोलीस शिपाई बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रेल्वे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुटे, कोळी, पोलीस नाईक पोळ, पोलीस शिपाई घोलप, चव्हाण आणि सुरवसे असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस अधिकारी आणि शिपायाची नावे आहेत. सर्व पोलीस कर्मचारी हे सर्व वडाळा पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्याकडे प्रतिबंध विभाग सोपवण्यात आला होता. ७ जानेवारी रोजी दिवसभरात या पोलीस कर्मचार्‍यांनी ट्रेनच्या मालडब्यातून प्रवास करणार्‍या दहा प्रवाशांवर कारवाई केली होती. मात्र, १०पैकी ९ जणांची सीसीटीएन कार्यप्रणालीमध्ये नोंद करून त्यांना समज देऊन सोडून दिले.

- Advertisement -

दहावा प्रवासी अब्बास अली खान (२७) या तरुणाची कुठेही नोंद न करता त्याच्याकडून पैसे घेऊन सोडून देण्यात आले होते. मात्र, आपल्याकडून पैसे घेऊन पावती न देता सोडून दिल्याची माहिती या तरुणाने आपल्या वडिलांना दिली. वडिलांनी याप्रकरणी रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले. पैसे घेतल्याचे प्रकरण आपल्याला भोवणार म्हणून या पोलीस कर्मचार्‍यांनी संगनमत करून दुसर्‍या दिवशी परस्पर सरकारी दस्तऐवजमध्ये फेरफार करून या तरुणांच्या नावाची नोंद करून त्या पुढे खोटी स्वाक्षरी केली. हा प्रकार वरिष्ठांच्या लक्षात येताच बोगस सरकारी दस्तऐवज तयार करून त्यात फेरफार केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी यांच्यासह ६ पोलीस कर्मचार्‍यांविरुद्ध वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात बुधवारी भा.दं.वि.४६५,४६८,४७१सह ३४ (बनावट दस्तऐवज तयार करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासून गुन्हा दाखल झालेले सर्व पोलीस कर्मचारी अटकेच्या भीतीने बेपत्ता झाले आहे.माझा मुलगा नुकताच उत्तर प्रदेश येथून मुंबईत आलेला आहे. तो मला भेटण्यासाठी गोवंडी येथून घरून माझगाव येथील दुकानावर ट्रेनने येत असताना त्याला वडाळा रेल्वे पोलिसांनी माल डब्यातून प्रवास करीत असताना पकडले. त्याच्याकडून दंड वसूल करून पावती दिली नाही. याबाबत मी माझ्या मालकाच्या कानावर ही बाब सांगितली असता, मालकाने रेल्वेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर या पोलिसांनी माझ्या मुलाला बोलावून घेतलेले पैसे परत करण्याची तयारी दाखवून माफी मागितली.
-अली खान, पीडित मुलाचे वडील

- Advertisement -

दोन अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे एकूण सहा जणांनी मिळून सरकारी दस्तऐवजात फेरफार केल्याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, या प्रकरणात तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
-राजेंद्र पाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वडाळा रेल्वे)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -