घरमुंबईबॉम्बे जिमखाना, सीसीआयमध्ये बेकायदा सिलिंडर साठा

बॉम्बे जिमखाना, सीसीआयमध्ये बेकायदा सिलिंडर साठा

Subscribe

मुंबईतील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल्स, जिमखाना यांची मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने पाहणी करण्यात येत असून गुरुवारी बॉम्बे जिमखाना आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)ची तपासणी करून त्यांच्याकडून अनधिकृत साठा केलेल्या ४३ गॅस सिलिंडरचा साठा जप्त केला. या अनधिकृत साठ्याप्रकरणी दोन्ही क्लबना अग्निशमन दलाच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबईत गेल्या काही महिन्यांपासून आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ झालेली आहे. महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवरक्षक कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे नियमांचे पालन केले जात नसल्याने आगीच्या दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. म्हणून आग प्रतिबंधक उपाययोजनांच्या शिफारशींची पूर्तता झाली किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी अग्निशमन दलाच्यावतीने स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या अधिकार्‍यांसह महापालिकेच्या ए विभागाचे परवाना, इमारत व कारखाने तसेच आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांसह संयुक्तपणे बॉम्बे जिमखान्याच्या स्वयंपाक घराची पाहणी केली.

- Advertisement -

बॉम्बे जिमखाना येथील मुख्य स्वयंपाकघरात योग्य प्रकारची काळजी घेतली जात असली तरी कर्मचार्‍यांच्या उपहारगृहात अनधिकृत साठा करून ठेवलेले औद्योगिक वापराचे तीन गॅस सिलिंडर आढळून आले. इलेक्ट्रीक पॅनेलमध्ये हे गॅस सिलिंडर होते. त्यामुळे गॅस सिलिंडर जप्त करून त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याचे प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले.

सीसीआयचीही पाहणी गुरुवारी करण्यात आली आहे. याठिकाणी परवान्यापेक्षा ४३ गॅस सिलिंडरचा साठा आढळून आला. या गॅस सिलिंडरबाबत सीसीआयला कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नव्हती. यातील ४१ गॅस सिलिंडर कॅबिनेटमध्ये आढळले तर एक गॅस सिलिंडर मोकळा होता. याशिवाय सीसीआयच्या दुसर्‍या मजल्यावर जोडणी बदल तसेच नूतनीकरणाचे काम सुरू आहे. याचा वापर निवासी वापरासाठी तसेच पार्टीसाठी केला जातो. परंतु, अग्निशमन दल किंवा इमारत प्रस्ताव विभागाची एनओसीही त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव सुरक्षा उपाय २००६ अंतर्गत नोटीस जारी केल्या जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -