घरताज्या घडामोडीमाजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना पुन्हा सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी

माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना पुन्हा सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी

Subscribe

शिवसेनेतील आमदारांची कामे होत नसल्याची तक्रार वारंवार केली जात असल्यामुळे शिवसेनेचे नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसेनेच्या आमदारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांनी रवींद्र वायकर यांच्याकडे समन्वयाची भूमिका देणार असल्याचे सुतोवाच केले. याआधी देखील वायकर यांना मुख्यमंत्री कार्यालयात समन्वयकाची जबाबदारी देऊन त्यांना शासकीय सुविधा दिल्या होते. मात्र ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा काढून भाजपने टीका केल्यानंतर त्यांची नियुक्ती रद्दबातल करण्यात आली होती.

राज्यात सध्या कोरोनाचे संकट उभे असून दुसऱ्याबाजूला विरोधकही चांगलेच आक्रमक झालेले आहेत. मंत्री आपापल्या विभागात कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी काम करत आहेत. तर आमदारांना मुंबईत येऊन संबंधित मंत्री किंवा प्रशासनाकडे आपल्या कामाचा पाठपुरावा करता येत नाही. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालय प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मातोश्रीच्या अगदी जवळचे मानले जाणारे आमदार रवींद्र वायकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नसल्यामुळे ते नाराज होते. त्यामुळे ११ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना सीएमओ कार्यालयात समन्वयकाचे पद देण्यात आले होते. तर महाविकास आघाडी सरकारसाठी आपल्या मंत्रीपदाची आहुती देणारे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांना केंद्रातील समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली होती. या दोन्ही पदांसाठी शासकीय लाभ, भत्ते देण्यात येत असल्याचा शासन निर्णयही काढण्यात आला होता. मात्र विरोधकांनी ऑफिस ऑफ प्रॉफिटचा मुद्दा उकरून काढला.

आमदार किंवा खासदार पदावर असलेली व्यक्ती शासनाकडून अशाप्रकारचे लाभ घेऊ शकत नाही. जर त्यांना हे पद कायम ठेवायचे असेल तर आमदार आणि खासदार पदाचा राजीनामा द्यावा लागला असता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने एक पाऊल मागे घेत ही दोन्ही पदे नामंजूर केल्याचा नवीन शासन निर्णय काढला होता. मात्र यावेळी सर्व तांत्रिक मुद्द्याचा अभ्यास करुन त्यातून मार्ग काढला असल्याचे शिवसेनेतील सुत्रांनी आपलं महानगरला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -