घरमुंबईCorona : मुंबई लोकलमध्ये बनावट कार्ड वापरून प्रवास करणाऱ्या तरूणीला अटक!

Corona : मुंबई लोकलमध्ये बनावट कार्ड वापरून प्रवास करणाऱ्या तरूणीला अटक!

Subscribe

Corona च्या पार्श्वभूमीवर गेल्या ५ महिन्यांपासून मुंबईची लाईफलाईन ठरलेली मुंबई लोकल सामान्य प्रवाशांसाठी पूर्णपणे बंद आहे. पहिले तीन महिने तर लोकल सर्वच प्रकारच्या प्रवाशांसाठी बंद होती. नंतर १५ जूनपासून लोकलमध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली. यामध्ये सार्वजनिक वाहतूक कर्मचारी, डॉक्टर, रुग्णालयातील इतर कर्मचारी, पालिकेतील कर्मचारी, सरकारी बँकांमधले कर्मचारी आदींचा समावेश आहे. याव्यतिरिक्त इतर कुणालाही मुंबईच्या लोकमधून प्रवासाची परवानगी नाही. यासाठी मुभा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष QR कोड असलेली आयडी कार्ड अर्थात ओळखपत्र देण्यात आली आहेत. मात्र, अशाच प्रकारची बनावट ओळखपत्र देखील वापरात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी GTP अर्थात रेल्वे पोलिसांनी एका तरूणीला अटक केली आहे.

पालिका कर्मचाऱ्याचा QR Code तरुणीच्या कार्डवर!

राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात वेगवेगळ्या स्तरावर लॉकडाऊन लागू केलेला आहे. या पार्श्वभूीवर मुंबई लोकल देखील सामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्या आली आहे. सामान्य मुंबईकरांना देखील लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी सध्या होत असली, तरी त्यासंदर्भातला कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, शुक्रवारी Western Railway वरील बोरिवली स्थानकावर तिकीट चेकरने एका २१ वर्षीय तरुणीला बनावट ओळखपत्रासोबत पकडलं. या तरुणीला त्याने हटकल्यानंतर तरुणीने आपल्याकडचं QR Code असलेलं ओळखपत्र दाखवलं. टीसीने संशय आल्यामुळे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तो एका मुंबई महानगर पालिका (BMC) कर्मचाऱ्याला देण्यात आलेल्या ओळखपत्राचा कोड होता. हा प्रकार लक्षात येताच टीसीने सदर तरूणीला रेल्वे पोलिसांच्या (GRP) हवाली केलं.

- Advertisement -

तरुणीविरोधात गुन्हा दाखल

जीआरपीने तरुणीची चौकशी केल्यानंतर तिच्याकडे लोकलच्या सेकण्ड क्लासचा विरार ते चर्चगेट असा व्हॅलिड पास होता. पण तिच्याकडचं स्पेशल क्यू आर कोड ओळखपत्र मात्र बनावट निघालं. त्यामुळे या तरुणीला अटक करण्यात आली असून तिच्याविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४६५, ४६८ आणि ४७१ नुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणीने हे बनावट कार्ड कसं मिळवलं, याचा जीआरपी शोध घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -