घरमुंबईझाडांची कत्तल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच - काँग्रेस

झाडांची कत्तल करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच – काँग्रेस

Subscribe

आरेतील २,२३८ झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी दिली आहे.

‘मेट्रो ३’चे कारशेड आरेमध्ये बांधण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि राज्य सरकार यांनी घेतला. हे बांधकाम करण्याकरिता आरेतील २,२३८ झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा निर्णय मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला. मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या या निर्णयाबद्दल मुंबई मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने देखील मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांच्या निर्णयावर सडकून टीका केली. मुंबई मनपा आयुक्त यांनी आरेतील २,२३८ झाडांची कत्तल करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखालीच घेतला आहे. वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली या निर्णयास संमती दिली, असा आरोप मुंबई काँग्रेसतर्फे करण्यात आला. या पर्यावरण विघातक निर्णयाविरोधात मुंबई काँग्रेस येणाऱ्या काळात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – अन्यथा महाजनादेश यात्रा अडवू – नाना पटोले

- Advertisement -

‘हा निर्णय पर्यावरणासाठी घातक’

या निर्णयावर टीका करताना रवी राजा म्हणाले की, ‘मेट्रो कारशेड आरेमध्ये बांधण्यासाठी सर्व क्षेत्रातून प्रचंड प्रमाणात विरोध होत असताना देखील मुंबई मनपा आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आरेतील २,२३८ झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा निर्णय पर्यावरणासाठी घातक आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त आणि पीठासीन अधिकारी यांच्या या निर्णयाचा विरोध केला. तेव्हा मनपा आयुक्तांनी त्यांच्या बोलण्यामध्ये अडथळा टाकला. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक नाराज झाले आणि वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीतुन त्यांनी सभात्याग केला आणि या निर्णयाविरोधात निदर्शने केली. काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभात्याग केल्यानंतर या निर्णयाबाबत मतदान घेण्यात आले आणि निर्णय मंजूर करून घेण्यात आला. या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये शिवसेनेचे जास्त सदस्य आहेत. शिवसेना आजपर्यंत आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या बांधकामाला विरोध करत होती, ते फक्त दिखाव्याचे नाटक होते हेच यावरून स्पष्ट होते. तसेच या समितीमध्ये असलेल्या प्रशासनाने नेमलेल्या ३ अ-राजकीय सदस्यांनी देखील या निर्णयाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीमधील भाजप, ३ अ-राजकीय सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या निर्णयाच्या बाजूने मतदान केले आणि हा निर्णय मंजूर करण्यात आला.’ यावरून हा निर्णय मुंबई मनपा आयुक्त, भाजप आणि वृक्ष प्राधिकरण समितीचे अ-राजकीय सदस्य यांच्या संगनमताने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखालीच आरेतील २,२३८ झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला हे स्पष्ट होत आहे, असा आरोप मनपा विरोधी पक्ष रवी राजा यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -