घरमुंबईमहापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती

Subscribe

दररोज ३०० किलो कचऱ्यावर प्रक्रिया करणारे अत्याधुनिक यंत्र कार्यान्वित करण्यात आले असून प्रकल्पातून तयार होणारा कचरा पालिका उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे. 

मुंबई महापालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यक्षेत्रात मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या गिल्डर टॅन्क येथील मनपा कर्मचारी वसाहतीतून निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे अत्याधुनिक यंत्र आजपासून कार्यान्वित करण्यात आले आहे. दररोज सुमारे ३०० किलो एवढ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणाऱ्या या यंत्राच्या वापराची सुरुवात महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रशिक्षण

गिल्डर टॅन्क येथील मनपा कर्मचारी वसाहतीत १४४ घरे असून लोकसंख्या सुमारे ७२० एवढी आहे. या वसाहतीतून दररोज सुमारे ३०० किलो ओला कचरा तयार होतो. या ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होऊन पर्यावरणपूरकता साधली जावी, यासाठी या वसाहतीमध्ये सुमारे दोन वर्षापूर्वी कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यात सुरुवात करण्यात आली होती. आता याच वसाहतीमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती करणारे अत्याधुनिक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. ज्यामुळे कचऱ्यापासून खत निर्मिती होण्याच्या प्रक्रियेचा कालावधी लक्षणीय स्वरुपात कमी होणार आहे. या अनुषंगाने ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याचे प्रशिक्षण वसाहतीमधील नागरिकांना यापूर्वीच देण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्रीय पथकाची ब्रम्हनाळ, भिलवडी परिसराला भेट

महापालिकेच्या उद्यानांमध्य खताचा वापर

कचऱ्यापासून खत निर्मिती करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रामध्ये कचरा टाकल्यानंतर त्यापासून साधारणपणे २४ तासात खत निर्मिती होण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. यानुसार खत निर्मिती प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर यंत्रातील कचरा काढून तो यंत्राच्या बाहेर असणाऱ्या ‘ट्रे’मध्ये ठेवण्यात येतो. ‘ट्रे’ मधील या प्राथमिक स्वरुपाच्या खताचे एका आठवड्यात वापरायोग्य खतामध्ये रुपांतर होते. प्राथमिक स्वरुपाचे खताचे वापरा योग्य खतामध्ये रुपांतर होण्यासाठी आवश्यक असणारे आठ ‘ट्रे’ हे सदर यंत्रामध्येच समाविष्ट करण्यात आले आहेत. यानुसार प्रक्रियेअंती साधारणपणे ३०० किलो कचऱ्यापासून सुमारे ५० किलो एवढ्या प्रमाणात खत प्राप्त होते. या यंत्राद्वारे प्राप्त होणारे खत हे महापालिकेच्याच उद्यानांमध्ये वापरले जाणार आहे, अशी माहिती यानिमित्ताने सहाय्यक आयुक्त मोटे यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -