घरमुंबईकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आले अडचणीत

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आले अडचणीत

Subscribe

प्रभाग समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक असून ते शिवसेना किंवा सपाच्या बाजुने मतदान करत असतात. मात्र, आता 'एम-पूर्व' प्रभाग समिती निवडणुकीत पाठिंबा देणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांना महागात पडणार आहे.

मुंबई महापालिकेच्या १६ प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आल्यानंतर यातील १४ प्रभाग समित्यांमध्ये अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. मात्र, उर्वरीतमधील ‘एम पूर्व’ प्रभाग समितीत रंगतदार लढत होणार आहे. या प्रभाग समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी एक नगरसेवक असून ते शिवसेना किंवा सपाच्या बाजुने मतदान करत असतात. परंतु यंदा २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान करणे महागात पडणार आहे. या निवडणुकीचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीवर होणार असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना या निवडणुकीत तटस्थ राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ते वरिष्ठांचे ऐकतात की नेहमीप्रमाणे स्वत:चे निर्णय घेवून पक्षाला अडचणीत आणता आहेत, याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पक्षांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १६ प्रभागांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. यातील ८ प्रभागांमध्ये भाजपचे नगरसेवक आणि ६ प्रभागांमध्ये शिवसेनेचे नगरसेवक प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध म्हणून निवडून आले आहेत. तर ‘एम-पूर्व’ आणि ‘ए,बी आणि ई’ या दोन प्रभाग समित्यांमध्ये रंगतदार लढती होणार आहे. ‘एम-पूर्व’ प्रभागात शिवसेना आणि भाजप युतीचे मिळून ७ नगरसेवक आहेत, तर समाजवादी पक्षाचे ५ नगरसेवक आहे. मागील निवडणुकीत समाजवादी पक्षाला एमआयएम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. तर काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी शिवसेनेला साथ दिल्याने या प्रभागात शिवसेनेचा नगरसेवक अध्यक्ष म्हणून निवडून आला होता. तर एकदा सपाच्या उमेदवाराला अर्ज मागे घेतल्याने बिनविरोध निवड झाली होती. परंतु यंदा शिवसेनेकडून वैशाली शेवाळे आणि सपाच्यावतीने रुक्साना नाझिम सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे मागील निवडणुकीत सेना आणि सपाला मतदान करणार्‍या काँग्रेसचे लोकरे आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नादीया शेख यांची अडचण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. मात्र त्या आघाडीमध्ये सपा नाही. दोन्ही पक्षांविरोधात सपा असताना, त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मतदान केल्यास त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होवून पक्षाची मोठी बदनामी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना तटस्थ राहावे लागेल, असे दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे मत बनले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निवडणुकीत दोन्ही पक्षांचे नगरसेवक काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -