घरमुंबईकरोना ड्युटीमुळे लग्नानंतर झाले कामावर हजर

करोना ड्युटीमुळे लग्नानंतर झाले कामावर हजर

Subscribe

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील डॉक्टर नव दाम्पत्याने दिले कामाला प्राधान्य

करोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने अनेक जोडप्यांना त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले होते. मात्र आता लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अनेकजण लग्न करण्याचा विचार करत आहेत. तसेच लग्नाच्या तयारीत असलेल्या मुंबई महापालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी करोना ड्युटीला प्राधान्य देत लग्न केल्यानंतर लगेच कामावर हजर राहण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्याचे लग्न सध्या हॉस्पिटलमध्ये कौतुकाचा विषय ठरले आहे.

जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील डॉ. हेमांगी देवराज आणि डॉ. संदीप पुराणिक यांचे २६ एप्रिलला लग्न ठरले होते. त्यांनीही लग्नाबाबत काही योजना बनवली होती. त्यानुसार त्यांनी तयारी सुरु केली. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. परिणामी त्यांना त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले. मुंबईत करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन या दोन्ही डॉक्टरांनी कोविड योद्धा बनत करोना रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. हेमांगी आणि संदीप हे दोघेही करोना ड्युटीमध्ये व्यस्त झाले असताना त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांना वारंवार लग्नासाठी विचारणा होऊ लागली. परंतु करोना ड्युटीमध्ये व्यस्त असल्याने आणि लॉकडाऊन असल्याने लग्न करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीमध्ये १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हेमांगी आणि संदीप यांनी न्यायालयात जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. करोना ड्युटी असल्याने सुट्टी मिळणे अशक्य असल्याने दोघांनीही १० जूनला लग्न करण्याचे ठरवले.

- Advertisement -

करोनाच्या परिस्थितीमुळे डॉक्टरांची कमतरता आणि वाढते रुग्ण लक्षात घेता दोघांनीही लग्नासाठी सुट्टी न घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकार्‍यांशी ड्यूटीची अदलाबदल करून बुधवारी सकाळी जोगेश्वरीतील निर्मल नगर येथील राम मंदिर गाठले व तेथे काका, ताई, भावोजी आणि एक दोन मित्र यांच्या उपस्थित लग्न केले. त्यानंतर त्यांनी वांद्रे येथील रजिस्टार कार्यालयात जाऊन लग्न केल्याची माहिती डॉ. हेमांगी देवराज यांनी दिली. लग्नासाठी ड्युटीची अदलाबदल केली असल्याने लग्न झाल्यानंतर या दोन्ही दाम्पत्याने करोना ड्युटीला प्राधान्य देत ते कामावर हजर झाले.

मित्रांनी लावली हळद आणि मेहंदी
डॉ. संदीप हे नाशिकचे तर डॉ. हेमांगी या जळगावच्या रहिवासी असल्याने त्यांचे आई वडील लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु लग्नापूर्वी लावण्यात येणारी हळद आणि मेहंदीचे कार्यक्रम त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी करून त्यांना कुटुंबियांची कमतरता भासू दिली नाही. मंगळवारी रात्री ८ वाजता आपली ड्युटी संपवुन डॉ. हेमांगी रूमवर जाऊन मेहंदी काढत बसल्या असताना त्यांच्या सहकारी डॉक्टरांनी अचानक रूमवर येऊन त्यांना हळद लावणे, मेहंदी काढणे, संगीत हे कार्यक्रम केल्याचे डॉ. हेमांगी यांनी सांगितले.

- Advertisement -

पत्रिकेतून दिला ’घरी राहा, सुरक्षित राहा’चा संदेश
डॉ. हेमांगी आणि संदीप यांनी आपल्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही छापली असून या पत्रिकेत त्यांनी आमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणात आमचे प्रियजन नसतील याचे आम्हाला दुःख असेल. पण करोनाच्या काळात घरात राहणे आवश्यक आहे. त्यामुळे ’घरी राहा, सुरक्षित राहा’ असे संदेश त्यांनी पत्रिकेतून दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -