घरमुंबईपाच आरोपी करोनाग्रस्त सापडताच पोलीस क्वारंटाईन झाले

पाच आरोपी करोनाग्रस्त सापडताच पोलीस क्वारंटाईन झाले

Subscribe

दुकान फोडणार्‍या दरोडखोरांना साहसाने पकडले

करोना संसर्गाच्या काळात कोण पॉझिटिव्ह असेल अथवा निगेटिव्ह हे कोणालाही छातीठोकपणे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांपासून ते कायदा राबवणार्‍यांपर्यंत प्रत्येकजण साशंक झाला आहे. स्कॉटलंड यार्डशी स्पर्धा करणार्‍या मुंबई पोलिसांमध्ये तर आता गुन्हेगारांची वेगळीच दहशत निर्माण झाली आहे. जीवाची बाजी लावून गुन्हेगारांना पकडायचे पण तो करोना पॉझिटिव्ह असेल तर? अशा भितीने गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले पोलीस सध्या गर्भगळीत झाले आहे. त्याला तसेच कारणही आहे. चेंबूर येथील इलेक्ट्रॉनिक दुकानात सुमारे साडेपाच लाख रुपयांची घरफोडी करण्यात आली होती. पोलिसांनी प्राणपणाने घरफोडी करणार्‍या सात दरोडेखोरांना अटकही केली, मात्र त्यापैकी पाच दरोडेखोर हे पॉझिटिव्ह आढळल्याने आता पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

चेंबूर येथील सेल कॉलनी रोडवर यातील तक्रारदाराचे एक इलेक्ट्रॉनिक दुकान आणि गोदाम आहे. 30 मेला रात्री उशिरा काही आरोपींनी या गोदामाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर गोदामातील सुमारे साडेपाच लाख रुपयांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन ही टोळी पळून गेली होती. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच दुकानाच्या मालकाने नेहरुनगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. पोलिसांनी जीवाची बाजी लावून त्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी गेल्या पाच दिवसांत सात आरोपींना अटक केली.

- Advertisement -

आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत सातही आरोपींनी घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानंतर या सर्वांना स्थानिक कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली. याच दरम्यान या सर्वांची करोना टेस्ट करण्यात आली. त्याचा रिपोर्ट मंगळवारी पोलिसांना प्राप्त झाला. त्यात पाच आरोपींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले. या पाचही आरोपींना करोना झाल्याचे उघडकीस येताच त्यांना तातडीने जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथेच त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या आरोपींना करोना झाल्याने त्यांची चौकशी करणार्‍या तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. एकाच वेळी पाच आरोपींचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोलीस ठाण्यात प्रचंड खळबळ उडाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -