घरमुंबईलोकसभा निवडणुकीत विजयाचे आमिष दाखवून २० लाखाचा गंडा!

लोकसभा निवडणुकीत विजयाचे आमिष दाखवून २० लाखाचा गंडा!

Subscribe

लोकसभा निवडणुकांमध्ये विजयी करून देतो असं आमिष दाखवून कापूरबावडीत एका दाम्पत्याला २० लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळक्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयी होण्याचे आमिष दाखवीत ५ कोटी रुपयांची ऑफर देऊन २० लाख रुपये घेऊन गंडा घालणाऱ्या तिघा जणांवर कापूरबावडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका भोंदूबाबाचा देखील समावेश आहे. नचिकेत जाधव रा. घणसोली नवी मुंबई, अरविंद शर्मा रा, चंदीगड, आणि गुरुदेव महाराज रा. छिंदवाडा, मध्यप्रदेश यांच्या विरोधात बुधवारी भादंवि ४२०, ४०६ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचं पोलिसांनी सांगितले.

बतावणीला भुलले आणि फसवले गेले!

शहर विकास विभागात नोकरीला असलेले विद्यासागर चव्हाण हे ठाणे कलेक्टर कार्यालयाच्या उपहारगृहात आपल्या मित्रांसोबत चर्चा करीत होते. ठाणे लोकसभा निवडणुकीत पत्नी शुभांगी हिला उभे करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. त्याचवेळी बाजूला बसलेला आरोपी नचिकेत जाधव याने ही चर्चा ऐकली. त्यानंतर नचिकेत याने चव्हाण यांच्याशी संपर्क करून लोकसभेत विजय मिळवण्याचे आमिष दाखवले. नचिकेतच्या या बतावणीला चव्हाण भुलले. नचिकेत आणि त्याचा मित्र अरविंद शर्मा यांनी विद्यासागर चव्हाण यांना त्यांच्या संपर्कातील भोंदूबाबा गुरुदेव महाराज याच्याकडे छिंदवाडा मध्यप्रदेश येथे नेले.

- Advertisement -

हेही वाचा – टिफीन सर्व्हिस ऑर्डरचे आमिष दाखवून फसवणूक

विजय दूरच, अनामतही जप्त झाली!

भोंदूबाबा गुरुदेव याने चव्हाण यांच्या पत्नीला लोकसभेत निवडून येण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात आरोपींनी चव्हाण यांच्याकडून ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यापैकी २० लाखाची रक्कम आरोपींनी स्वीकारली देखील असल्याचे तक्रारीत चव्हाण यांनी नमूद केले आहे. त्यानंतर चव्हाण यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातून पत्नीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडली. चव्हाण यांच्या पत्नीची अनामत रक्कमही जप्त झाली. त्यांना १ हजार १८८ मते मिळाली. त्यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी त्यांच्याकडे आपले पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र चव्हाण यांनाच त्यांनी दमदाटी केली आणि पैसे देण्यास नकार साफ दिला. त्यानंतर चव्हाण यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कपूर बावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -