घरमुंबईCyclone Tauktae: चक्रीवादळामुळे कोसळलेली ७० टक्के झाडे विदेशी; मुंबई महापालिकेचा दावा

Cyclone Tauktae: चक्रीवादळामुळे कोसळलेली ७० टक्के झाडे विदेशी; मुंबई महापालिकेचा दावा

Subscribe

८१२ झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातीची असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई परिसरात विविध ठिकाणच्या खासगी जागेतील ५०४, तर सार्वजनिक जागेतील ३०८ अशा ८१२ झाडांची पडझड झाली आहे. तसेच, या ८१२ झाडांपैकी ७० टक्के झाडे ही विदेशी प्रजातीची असल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाने केला आहे. मुंबईत तौत्के चक्रीवादळाचा १६ आणि १७ मे रोजी मोठा प्रभाव दिसून आला होता. मुंबई शहर व उपनगरात ११४ किलोमीटर प्रतितासपेक्षा अधिक वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे शहर व उपनगरात विविध प्रकारची ८१२ झाडे मंत्रालय, भायखळा, सेनाभवन आदी ठिकाणी पडली. यापैकी ५०४ झाडे ही खासगी जागेतील, तर ३०८ झाडे ही सार्वजनिक जागेतील आहेत.

चक्रीवादळामुळे झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. तथापि, महापालिकेच्या उद्यान विभागाने दिवसरात्र मेहनत घेत विविध पद्धतीने नियोजन व कार्यवाही करुन ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केल्याचा दावाही पालिका प्रशासनाने केला आहे.

- Advertisement -

पालिका स्थानिक प्रजातीची झाडे लावणार

वादळामुळे कोसळलेल्या ८१२ झाडांपैकी ७० टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची असून यामध्ये प्रामुख्याने सोनचाफा, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. ही बाब पालिकेने अतिशय गंभीरपणे नमूद केली आहे. यापुढे मुंबईत विशेषतः महापालिका क्षेत्रात वृक्षारोपण करताना स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेण्यात येईल व त्यावर आवश्यक ती कृती करण्यात येईल, असे पालिकेने म्हटले आहे.

तीन दिवसांच्या कालावधीत पडलेल्या ८१२ पैकी २४९ झाडे ही शहर भागातील, तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील असून उर्वरित ३०७ झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही १६ व १७ मे २०२१ रोजी पडली. तर २६७ झाडे ही १८ मे रोजी पडली. मुंबईत ८१२ झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे १ हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. यापैकी ७९८ फांद्या या खासगी जागेतील असून उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक जागेतील आहेत.

- Advertisement -

पालिका वृक्षरोपणाबाबत नवीन धोरण आखणार

नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच वृक्ष परिक्षणाची कार्यवाही देखील नियमितपणे करण्यात येईल, असेही उद्यान विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -